कोल्हापुरात गणेश विसर्जनाची १८ तास जल्लोषी मिरवणूक
schedule07 Sep 25 person by visibility 32 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लाइट इफेक्टसचा झगमगाट, डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई, डीजेच्या तालावर ठेका धरणारी पावलं, संगीताच्या तालावर हात उंचावत नृत्य करणारी हजारो तरुण आणि गणपती बाप्पा मोरयाचा अखंड गजर अशा जल्लोषी वातावरणात कोल्हापुरात १८ तास गणेश विसर्जन मिरवणूक निघाली. शनिवारी सकाळी ९.३० वाजता सुरू झालेला हा जल्लोष रविवारी पहाटे चार वाजेपर्यंत अखंडपणे सुरू होता. कोल्हापुरातील अनेक सार्वजनिक तरुण मंडळांनी, मिरवणुकीत समाज प्रबोधनपर देखावे आणत जनजागृतीची परंपरा कायम राखली.
लेझीम, झांजपथक, ढोलपथक, धनगरी ढोल अशा पारंपरिक वाद्यांच्या गजर मिरवणूक मार्गावर दुमदुमत होता. शुक्रवारी सकाळी ९ वाजता मिरवणुकीला शाहू खासबाग येथून सुरुवात झाली. मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेशमूर्तीचे पूजन करण्यात आले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पालखी पूजन झाले.
ढोलताशांचा निनाद, पारंपरिक खेळाचे सादरीकरण आणि महिलांचा सहभाग हे मंडळाचे वेगळेपण ठळकपणे जाणवत होते. गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत मिरवणूक निघाली. सकाळी व दुपारच्या सत्रात मिरवणुकीत सहभागी सार्वजनिक तरुण मंडळांनी लाठीकाठी, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली. छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ, लेटेस्ट तरुण मंडळ, खंडोबा तालीम मंडळाच्या मिरवणुका आकर्षण ठरल्या. अनेक मंडळांनी गणेशोत्सवातील देखावे मिरवणुकीत आणले होते. सुबक मूर्ती आणि विविध विषयावरील देखावे नागरिकांचे आकर्षण ठरले. सायंकाळी पाच नंतर मिरवणूक मार्गावर गर्दी होऊ लागली.
सायंकाळी सात नंतर मुख्य मिरवणूक मार्गावर गर्दीचा महापूर उसळला. रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, लाइट इफेक्टसनी मिरवणूक मार्गावर झगमगाट निर्माण झाला. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड , पापाची तिकटी, गंगावेश या मार्गावर तरुणाईच्या जल्लोषाला उधाण आले होते. नंगीवली तालीम मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ, बीजीएम, बालगोपाल, तटाकडील, मित्रप्रेम, हिंदवी, वाघाची तालीम, दिलबहार तालीम मंडळ मुख्य मिरवणूक मार्गात सामील होती डीजेच्या तालावर ठेका, हात उंचावत नाचणारे तरुण आणि विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटणारे नागरिक असे चित्र पाहावयास मिळत होते. रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास कसबा गेट येथे चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत गर्दी पांगविण्याचा प्रयत्न केला.
रात्री बारा वाजेपर्यंत हा जल्लोष् टिपेला पोहोचला. कोर्टाच्या आदेशानुसार रात्री बारा वाजता साऊंड सिस्टीम बंद करण्यात आले. साऱ्याच मंडळांनी कोर्टाच्या आदेशाचा सन्मान राखत साऊंड सिस्टीम बंद ठेवले. यावेळी कार्यकर्त्यांनी टाळयांचा गजर करत मिरवणुका पुढे नेल्या. पहाटे चार नंतर क्रांतिवीर भगतसिंह तरुण मंडळाच्या गणेशमूर्तीची आरती करुन मिरवणुकीची सांगता झाली. इराणी खणीमध्ये २७६४ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. महापालिका प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती. किरकोळ अपवाद वगळता मिरवणूक व्यवस्थित पार पडली. पर्यायी मार्गाचा ३०० मंडळांनी वापर केला.