महाडिक गटाच्या दूध उत्पादक सभासदांची बैठक, शौमिका महाडिक सोमवारी भूमिका स्पष्ट करणार
schedule07 Sep 25 person by visibility 34 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची मंगळवारी (९ सप्टेंबर २०२५) वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर संचालिका शौमिका महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये शिरोली येथे महाडिक गटाच्या दूध उत्पादक सभासदांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला हातकणंगलेचे आमदार अशोक माने यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संग्रामसिंह कुपेकर, बी. जी. बोराडे आदी उपस्थित होते. या बैठकीत वार्षिक सर्वसाधारण सभेत काय भूमिका घ्यायची यासंबंधी चर्चा झाली. दरम्यान महाडिक गट हा गेली चार वर्षे गोकुळमध्ये विरोधी बाकावर होता. मात्र तीन महिन्यापूर्वी गोकुळमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक झाली. महायुतीच्या वरिष्ठ पातळीवरुन हालचाली झाल्या. महायुतीचा चेअरमन करावा असा आदेश् निघाला. संचालक नविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड झाली. गोकुळमध्ये महायुती झाल्यामुळे संचालिका महाडिक या आता वार्षिक सर्वसाधारण सभेत दूध उत्पादकांसोबत सभेला येणार की संचालक मंडळासोबत व्यासपीठावर असणार ? याकडे लक्ष आहे. दरम्यान महाडिक या, वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात सोमवारी (आठ सप्टेंबर) भूमिका स्पष्ट करणार आहेत.