नोकर भरतीच्या आरोपावरुन सुनील एडकेंचे राजमोहन पाटलांना चॅलेंज, माफी मागण्यासाठी उद्यापर्यंतची दिली मुदत
schedule07 Sep 25 person by visibility 565 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दि प्राथमिक शिक्षक बँकेतील सभेतील वादाचे पडसाद सभा संपल्यांनतरही उमटत आहेत. बँकेचे माजी अध्यक्ष व विरोधी आघाडीतील राजमोहन पाटील यांनी, शिरोळमधील नेत्यांनी, आपल्या नातेवाईकाला बँकेत नोकरी लावल्याचा आरोप सभेत केला होता. त्या आरोपाला सत्ताधारी आघाडीचे संचालक सुनील एडके यांनी उत्तर देताना, ‘माझी नातलग महिला बँकेत भरती केली असेल तर ते सिध्द करा मी उद्या माझ्या पदाचा राजीनामा देऊन कायम स्वरूपी राजकारण सोडून देतो जर हे खोटे असेल तर आपण सर्व जिल्ह्याची जाहीर माफी मागावी.’असे आव्हान राजमोहन पाटील यांना दिले आहे.
बँकेच्या ८७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरमन शिवाजीराव रोडे पाटील यांनी, ‘शिक्षक बँकेच्या निवडणुकीच्या कालावधीत आम्ही सभासदांना वचन दिले आहे, की बँकेतील कर्मचाऱ्यांची संख्या तीन अंकी करणार नाही. नजीकच्या काळात बँकेत काही जागा भरल्या जातील, पण कर्मचाऱ्यांची संख्या ९९ पुढे जाणार नाही. या भरतीमध्ये माझा मुलगा, भाचा, पुतण्याला बँकेत नोकरीला लावणार नाही. बँकेच्या संस्थापकांची शपथ घेऊन हे सांगतो.’असे म्हटले. चेअरमन पाटील यांच्या या विधानावर विरोधी आघाडीचे राजमोहन पाटील यांनी, ‘प्राथमिक शिक्षक बँकेत मुलगा, भाचा आणि पुतण्याला नोकरी लावणार ही चेअरमन शिवाजीराव रोडे-पाटील यांची वल्गना खोटी आहे.. बँकेत आठ ते दहा कर्मचाऱ्यांची भरती झाली आहे. या प्रक्रियेदरम्यान चेअरमन पाटील यांनी त्यांच्या वाट्याला आलेली जागा त्यांच्या आघाडीच्या शिरोळमधील नेत्याला दिली. त्या नेत्याचा नातेवाईक बँकेत नोकरी करत आहे. यामुळे चेअरमन पाटील हे खोटेनाटे सांगून सभासदांची दिशाभूल करत आहेत.’असा पलटवार केला होता.
राजमोहन पाटील यांच्या या टीकेवर सत्ताधारी आघाडीतील शिरोळ तालुक्यातील संचालक सुनील एडके यांनी जोरदार उत्तर दिले आहे. एडके यांनी विरोधी आघाडीतील पाटील यांना उद्देशून आव्हान दिले आहे. एडके म्हणतात, ‘मी, जाहीर आवाहन करतो की मी माझी नातलग महिला बँकेत भरती केली असेल तर ते सिध्द करा. मी उद्या माझ्या संचालकपदाचा राजीनामा देऊन कायमस्वरूपी राजकारण सोडून देतो. जर हे खोटे असेल तर आपण जिल्ह्याची जाहीर माफी मागावी. मी उद्या पर्यंत वाट पाहत आहे. आपण संचालक असतान कोण नातेवाईक बँकेत लावलेत का हे सुद्धा जाहीर करावे.’