माझा मुलगा-भाचा- पुतण्याला बँकेत नोकरीला लावणार नाही- चेअरमन शिवाजीराव रोडे-पाटील
schedule07 Sep 25 person by visibility 124 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘शिक्षक बँकेच्या निवडणुकीच्या कालावधीत आम्ही सभासदांना वचन दिले आहे, की बँकेतील कर्मचाऱ्यांची संख्या तीन अंकी करणार नाही. नजीकच्या काळात बँकेत काही जागा भरल्या जातील, पण कर्मचाऱ्यांची संख्या ९९ पुढे जाणार नाही. या भरतीमध्ये माझा मुलगा, भाचा, पुतण्याला बँकेत नोकरीला लावणार नाही. बँकेच्या संस्थापकांची शपथ घेऊन हे सांगतो.’असे खुले आव्हान दि प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन शिवाजीराव रोडे-पाटील यांना विरोधकांना दिले.
प्राथमिक शिक्षक बँकेच्या ८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (७ सप्टेंबर २०२५) झाली. या सभेत नोकर भरती आणि कर्मचाऱ्यावरील पगाराचा विषय गाजला. चेअरमन पाटील म्हणाले, ‘मागील संचालक मंडळाच्या कारकिर्दीत २०२१ मध्ये बँकेतील कर्मचाऱ्यांच्या पगारावर सात कोटी १३ लाख रुपये खर्ची पडायचे. आमच्या कालावधीत कर्मचाऱ्यांची संख्या २६ ने कमी केली. सध्या पगारावर पाच कोटी ९२ लाख रुपये खर्च होतात. काटकसरीचा कारभार, कर्मचाऱ्यांची संख्या कमी यामुळे वर्षाला ६१ लाख रुपयांची बचत होत आहे. शिवाय कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा करार पाच वर्षाचा केला आहे. बँकेचा व्यवसाय ७१७ कोटी रुपयावर गेला तरी ९३ कर्मचाऱ्यांच्यावर कामकाज सुरू आहे. मी तुलना केली नाही, फक्त प्रगती दर्शक तक्ता दाखविला.’
सरकारी कर्ज रोख्यांची कमी दराने यापूर्वीच्या संचालक मंडळाने विक्री केली. यामुळे वर्षाला पन्नास लाखाहून अधिक रकमेची तूट सहन करावी लागत आहे. पूर्वीच्या संचालक मंडळाच्या कालावधीत दोन वेळेला शून्य टक्के लाभांश होता. सभासदांच्या हाती भोपळा मिळाला. सभासदांच्या हक्काच्या पैशाची उधळपट्टी कोणी केली ? आमच्यावर त्यांच्यासारखे शून्य टक्के लाभांश देण्याची वेळ आली तर, आता व्यासपीठावर जे संचालक दिसतात ते पुन्हा व्यासपीठावर दिसणार नाहीत. पांढरी कपडे परिधान करुन व्यासपीठावर बसण्याचा अधिकार आम्हाला नाही. मात्र आम्ही चांगल्या पद्धतीने कारभार करत बँकेला प्रगतीपथावर नेऊ. आम्ही सत्तेत आल्यापासून गेली तीन वर्षे सलगपणे लाभांश देत आहोत. आम्ही सभासदांना दोन अंकी लाभांश देण्याची ग्वाही दिली आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रामाणिक कर्जदारांना अर्धा टक्के रिबीट देऊ.’ दरम्यान सभेचे कामकाज उत्कृष्टरित्या चालविले म्हणून सत्तारुढच्या समर्थकांनी, चेअरमन रोडे-पाटील व व्हाइस चेअरमन सुरेश कोळी यांचा सत्कार केला.