गोकुळच्या अध्यक्षपदाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
schedule17 May 25 person by visibility 122 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदावरुन निर्माण झालेला तिढा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात पोहोचला आहे. चेअरमन अरुण डोंगळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळचा अध्यक्ष हा महायुतीचा असावा असे म्हटल्याचे सांगत राजीनामा देणार नसल्याचे सांगितले. त्यावर गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी, ‘डोंगळेच्या चेअरमनपदाला आता मुदतवाढ नाही. गोकुळसंदर्भातील वस्तुस्थिती मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून सांगणार आहे. मंगळवारी त्यांची भेट घेणार आहे.’असे शुक्रवारी सांगितले. यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाबाबतचा फैसला आता मुख्यमंत्र्यांच्यासमोर होईल असे चित्र दिसत आहे.
गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील व मंत्री मुश्रीफ यांनी, चेअरमन डोंगळे यांना पंधर मे रोजीच्या बोर्ड मिटींगमध्ये चेअरमनपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते. मात्र गोकुळ यांनी राजीनामा देणार नाही असा पवित्रा घेतला. डोंगळे यांची बंडखोरी ही आमदार पाटील व मंत्री मुश्रीफ यांना धक्का मानला जातो. दुसरीकडे नेते मंडळींनी डोंगळे यांचे बंड मोडून काढण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. निवडून आलेले सतरा संचालक व दोन स्विकृत संचालक असे १९ संचालकांनी संयुक्तपणे ‘आम्ही सारे एकसंध आहोत. गोकुळमधील सत्ताधारी आघाडीच्या नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहू.’अशी भूमिका घेत डोंगळे यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी ही दिवसभर, गोकुळचे संचालक विश्वास पाटील, अजित नरके, शशिकांत पाटील चुयेकर, बयाजी शेळके यांनी भेट घेतली. डोंगळे यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दुसरीकडे डोंगळे यांनी गुरुवारी पुन्हा मुंबई गाठली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली असल्याचे वृत्त आहे. तर डोंगळे यांचा राजीनामा व्हावा यासाठी गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते प्रयत्नशील आहेत. मंत्री मुश्रीफ यांनी, चेअरमन डोंगळे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.’ डोंगळे यांना खुर्चीची हाव सुटत नाही. त्यांना शब्द पाळायला हवा होता. काहीही झाले तरी डोंगळे यांना मुदतवाढ मिळणार नाही. गोकुळसंबंधी वस्तुस्थिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडली जाईल. मंगळवारी (२० मे २०२५) मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.’