तिरंगा पदयात्रेद्वारे भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाला सलाम
schedule17 May 25 person by visibility 25 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पहेलगाम येथे पर्यटकांवर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत भारतीय सैन्य दलाने अवघ्या दोनच दिवसात पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावली. भारतीय सैन्य दलाच्या या अतुलनीय पराक्रमाला सलाम करण्यासाठी कोल्हापुरात शनिवारी, १७ मे रोजी तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. शहरातील विविध भागातून निघालेल्या या पदयात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भारतीय जनता पार्टीच्या पुढाकारातून या पदयात्रेचे आयोजन केले होते. दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन पदयात्रेला सुरुवात झाली. यामध्ये नागरिक, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, जिल्ह्यातील माजी सैनिक, महिला यांची मोठी उपस्थिती होती. भारतमाता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम, भारतीय सैन्याचा विजय असो अशा घोषणांनी पदयात्रेचा मार्ग दणाणला
माजी सैनिकांच्या उपस्थितीने एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह निर्माण झाला होता. सैनिकी वेशभूषा परिधान करुन माजी सैनिक सहभागी झाले होते. सर्वांनी तिरंगा ध्वज हाती घेत सैन्याबद्दल प्रोत्साहन पर घोषणा देत ही पदयात्रा आईसाहेब महाराज पुतळा- बिंदू चौक- शिवाजी रोड मार्गे छत्रपती शिवाजी चौकात विसर्जित करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी व त्यांचे अभिनंदन करण्यासाठी देशभरात भाजपा तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहात काढत आहे. .
याप्रसंगी आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, महेश जाधव, शौमिका महाडिक, राहूल चिकोडे,माजी नगरसेवक राजसिंह शेळके, विलास वास्कर, किरण नकाते, संदीप सुपार, महिला आघाडीच्या रुपाराणी निकम, गायत्री राऊत, धनश्री तोडकर यांच्यासह कार्यकर्ते, नागरिकांचा सहभाग मोठा होता.