खासदार महाडिकांचे गोकुळसंदर्भात ज्ञान कमी, डोंगळेंच्यावर अविश्वास ठराव आणण्याची वेळ येणार नाही – आमदार सतेज पाटील
schedule16 May 25 person by visibility 60 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाविकास आघाडी म्हणून आम्ही गोकुळची निवडणूक लढवली नव्हती, गोकुळमध्ये मी आणि मंत्री हसन मुश्रीफ एकत्र असलो तरी आजरा कारखान्यात एकमेकांच्या विरोधात आहोत. त्यामुळे सहकारामध्ये पक्षीय राजकारण नसते. फॉर्मुलानुसार अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यावा. अशी अपेक्षा होती. सामंज्यसाने हा प्रश्न सुटेल. अविश्वासाचा ठराव आणण्याची वेळ येणार नाही.’ असा विश्वास विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान गुरुवारी, गोकुळच्या घडामोडीवर बोलताना भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी ‘गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष व्हावा यासाठी सकारात्मक पावले पडत आहेत. अजून खूप अदृश्य शक्ती गोकुळमध्ये उघड होतील. माजी आमदार महादेवराव महाडिक व कै. आमदार पी. एन. पाटील यांनी गोकुळचा कारभार चांगला केला होता. ’
खासदार महाडिकांच्या या विधानाकडे पत्रकारांनी लक्ष वेधल्यावर आमदार पाटील म्हणाले, ‘खासदार धनंजय महाडीक यांचे गोकुळ संदर्भात ज्ञान कमी असल्याची टीका त्यांनी केली. भीमा कारखान्याचे क्रशिंग किती झाले आहे हे त्यांनी सांगितले तर कोल्हापुरातील सहकाराला त्यांच मार्गदर्शन होईल.’ असा टोला लगावला. गोकुळमधील सध्याच्या घटनेवर भाष्य करताना आमदार पाटील म्हणाले, ‘गोकुळ अध्यक्षपदाच्या घडामोडीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. असे मला वाटत नाही, हे जिल्ह्याच राजकारण आहे. फॉर्मुलानुसार दोन दोन वर्ष ठरले होते. पंधरा मेपर्यंत डोंगळे यांनी राजीनामा द्यावा. अशी अपेक्षा होती अजून ही आहे. ’
‘अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यात येणार नसल्याचे खासदार महाडिक म्हणत आहेत. मात्र धनजंय महाडिक आता खासदार झाले आहेत त्यांनी माहिती घेणे अपेक्षित आहे. केंद्रीयमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात तिन राज्यांच्या मंत्र्यांची बैठक बोलावली होती. कृष्णा लवादाने निर्णय दिलेला आहे केंद्राने त्याचा गॅजेट काढायचा आहे ते गॅजेट काढू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कर्नाटक सरकारने निधीची तरतूद केली असून जागा देखील हस्तांतरित केली आहे. मग स्थगिती कशाची आहे. याची खासदारांनी माहिती घ्यावी ते दर आठवड्याला दिल्लीत जातात,’ ’असा टोलाही त्यांनी हाणला.