स्थानिक आयटी कंपन्यांना विश्वासात घेऊनच आयटीपार्कचा आराखडा होणार-अमल महाडिक
schedule06 Apr 25 person by visibility 46 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : स्थानिक आयटी कंपन्यांना विश्वासात घेऊन आयटी पार्कचा आराखडा बनवला जाईल अशी ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी दिली. कोल्हापुरातील युवकांना रोजगाराच्या संधी कोल्हापुरातच मिळाव्यात यासाठी मी आग्रही आहे. आयटी पार् मुळे हजारो तरुणांना भविष्यात रोजगार उपलब्ध होईल त्यामुळे आयटी पार्कच्या उभारणीसाठी टाईमलाईन निश्चित करण्याची गरज आमदार महाडिक यांनी बोलून दाखवली.
कोल्हापूर आयटी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची आमदार अमल महाडिक यांनी भेट घेऊन चर्चा केली. कोल्हापूर येथील आयटी पार्कची जागा लवकरात लवकर हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ही जागा एमआयडीसी कडे हस्तांतरित झाल्यानंतर रेखांकन आणि इतर गोष्टींना गती मिळणार आहे. १ मे पूर्वी ही जागा हस्तांतरित करून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यानंतर लेआउट तयार केला जाईल असे स्पष्ट केले. यावेळी आयटी असोशिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील, सचिव राहुल मेंच, फाउंडर प्रेसिडेंट अँड डायरेक्टर शांताराम सुर्वे, ॲड. विश्वंभर भोपळे आदी उपस्थित होते.
कोल्हापुरातील बहुप्रतिक्षित आयटी पार्कचे काम आता निर्णायक वळणावर आले आहे. आमदार अमल महाडिक यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून या कामाला चांगलीच गती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कृषी विभागाला तातडीने जिल्ह्यात अन्य ठिकाणी पर्यायी जागा देण्याचा निर्णय झाला होता. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनीही पर्यायी जागा मिळताच आयटी पार्कसाठीची प्रस्तावित जागा एमआयडीसी कडे हस्तांतरित करण्याला हिरवा कंदील दिला आहे. दहा एप्रिलपर्यंत याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे.