मॅनेजमेंट कौन्सिलच्या पुरुष गटातील निवडणूक पुढे ढकलली, विकास आघाडीला धक्का !!
schedule05 Apr 25 person by visibility 327 categoryशैक्षणिक
सुटाचा आक्षेप, विद्यापीठ प्रशासनाने मागविली कुलपती कार्यालयाकडे मार्गदर्शन
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवडण्यात येणाऱ्या पुरुष गटातील सदस्यपदाची निवडणूक पुढे ढकलली आहे. ११ एप्रिल २०२५ रोजी विद्या परिषदेच्या (अॅकेडमिक कौन्सिल) बैठकीत निवड करण्यात येणार होती. दरम्यान शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे (सुटा) उमेदवार प्रा. आर. के. निमट यांनी शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे उमेदवार प्रा. एस. पी. हंगेरगेकरी यांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदविला होता. यावर शनिवारी (५ एप्रिल) कुलगुरू डी. टी. शिर्के यांच्यासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने, याविषयी कुलपती कार्यालयाकडून मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाहीचा निर्णय घेतला. विद्यापीठ प्रशासनाकडून यासंदर्भात सोमवारी, (सात एप्रिल) कुलपती कार्यालयावर माहिती सादर केली जाणार आहे.
दरम्यान अॅकेडमिक कौन्सिलमधून मॅनेजमेंट कौन्सिलवर निवडण्यात येणाऱ्या महिला गटातील निवडीची प्रक्रिया ११ एप्रिल रोजी होणार आहे. महिला गटातून विकास आघाडीच्या उमेदवार डॉ. मंजिरी मोरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल आहे. यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. विषयपत्रिकेवर त्यांच्या निवडीचा विषय आहे. अॅकेडमिक कौन्सिलच्या बैठकीत अधिकृतपणे त्यांची निवडीची घोषणा होणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलच्या दोन जागा रिक्त आहेत. त्या दोन जागेसाठी सभा व निवडणूक विभागातर्फे सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. अॅकेडमिक कौन्सिलमधील जवळपास ५५ सदस्य मतदानास पात्र आहेत.
मॅनेजमेंट कौन्सिलवर निवडण्यात येणाऱ्या दोन जागेपैकी पुरुष गटामध्ये विकास आघाडीकडून प्रा. हंगेरगीकर व सुटाचे उमेदवार प्रा. निमट यांच्यामध्ये लढत होती. दरम्यान निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सुटाचे उमेदवार निमट यांनी विकास आघाडीचे उमेदवार हंगेरगीकर यांच्या उमेदवारीवरुन आक्षेप नोंदविले होते. त्यावर कुलगुरू शिर्के यांच्यासमोर शनिवारी सायंकाळी सुनावणी झाली.
अॅकेडमिक कौन्सिलमधून मॅनेजमेंट कौन्सिलवर निवडण्यात येणारे सदस्य हे शिक्षकांचे प्रतिनिधीत्व करतात. ते थेट शिक्षकातून निवडून आलेले असतात. मात्र प्रा. हंगेरगीकर यांची अॅकेडमिक कौन्सिलमधील नियुक्ती ही स्थायी समितीच्या शिफारशीनुसार झाली आहे. त्यामुळे त्यांना मॅनेजमेंट कौन्सिलसाठीची निवडणूक लढविता येणार नाही अशी हरकत प्रा. निमट यांनी घेतली होती. कुलगुरू शिर्के यांच्यासमोरील सुनावणीतही त्यांनी हाच मुद्दा मांडला. तर प्रा. हंगेरगीकर यांनी विद्यापीठाच्या नियमावलीनुसार आपली निवड झाली आहे. अॅकेडमिक कौन्सिलच्या बैठकाला मी उपस्थिती दर्शविली आहे. कामकाजात सहभाग आहे. तेव्हा माझ्याबाबत घेतलेला आक्षेप हा योग्य नाही. निवडणूक लढविण्यास मी पात्र आहे असा युक्तीवाद केल्याचे वृत्त आहे. कुलगुरू शिर्के यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतली. शिवाय याविषयी कुलपती कार्यालयाकडून मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला. आपसूकच ११ एप्रिल रोजी अॅकेडमिक कौन्सिलच्या बैठकीत होणारी पुरुष गटातील निवडणूक पुढे ढकलली.यासंबंधी सभा व निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव व्ही. एन. शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांना फोन घेतला नाही. हंगेरगीकर यांनीही फोन स्विकारला नाही.
अॅकेडमिक कौन्सिलमध्ये विद्यापीठ विकास आघाडीचे वर्चस्व आहे. महिला गटातील उमेदवार डॉ. मंजिरी मोरे यांची निवड बिनविरोध झाली, त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा ११ एप्रिलच्या अॅकेडमिक कौन्सिलच्या बैठकीत होणे शिल्लक आहे. मात्र पुरुष गटातील निवडणूक पुढे गेल्यामुळे विकास आघाडीला धक्का मानला जात आहे.