महापुरुषांच्या मूल्यचौकटीचा वारसा आजच्या पत्रकारितेनेही पुढे न्यायला हवा-डॉ. राधेश्याम जाधव
schedule05 Apr 25 person by visibility 42 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: पत्रकारितेच्या क्षेत्राने शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांनी प्रदान केलेल्या मूल्यांच्या चौकटीचा वारसा पुनःपुन्हा अधोरेखित करीत राहून त्याची नव्याने मांडणी करीत राहिले पाहिजे. सर्व प्रकारच्या शोषणाच्या चौकटींना तोंड देण्यासाठी त्यांनी सकारात्मक विचारांची मांडणी केली. त्यांच्या प्रेरणेतून साकार झालेल्या वृत्तपत्रांनीही कधी द्वेषाची मांडणी केली नाही, तर स्वीकारासाठीचा आग्रह मांडला. याच मूल्यचौकटीचा वारसा आजच्या पत्रकारितेनेही पुढे न्यायला हवा.’ असे प्रतिपादन ‘दि हिंदू’ या दैनिकाचे सिनिअर डेप्युटी एडिटर डॉ. राधेश्याम जाधव यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांच्या ‘शाहूपूर्व व शाहूकालीन वर्तमानपत्रे’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते ‘शाहूकालीन पत्रकारितेची मूल्यमीमांसा’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. मास कम्युनिकेशन विभागाच्या सभागृहात कार्यक्रम झाला.
डॉ. शिवाजी जाधव यांच्या पुस्तकातून कोल्हापूरच्या पत्रकारितेच्या अनुषंगाने अनेक नवे संदर्भ सामोरे आले आहेत, ते मुळातूनच वाचण्यासारखे आहेत, असे त्यांनी सांगितले.यावेळी डॉ. जयप्रकाश पाटील यांनी स्वागत व परिचय करून दिला. डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण पांढरे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुमेधा साळुंखे यांनी आभार मानले.