वेंगुर्लातील बॅरिस्टर खर्डेकर कॉलेज ठरले सर्वोत्तम ग्रामीण महाविद्यालय ! मुंबई विद्यापीठाकडून बहुमान !!
schedule12 Sep 25 person by visibility 59 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नामांकित शिक्षण संस्था म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाची ओळख. या संस्थेच्या वेंगुर्ला येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा “सर्वोत्तम ग्रामीण महाविद्यालय” हा बहुमान मिळाला आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठाने ही निवड केली असून १५ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
मुंबई विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. प्रसाद कारंडे यांनी कॉलेजचे अभिनंदन केले आहे. त्यांनी, “उत्कृष्टतेला परिपक्वता आणण्यासाठी वेळ लागतो आणि खर्डेकर महाविद्यालय असेच एक आहे. हा पुरस्कार म्हणजे विद्यार्थ्यांपासून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्या एकत्रित परिश्रमांची दाद आहे.” या बहुमानबद्दल कोकणातील ग्रामीण भागातील शिक्षणाच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले गेले आहे. अशा भावना उमटत आहेत. १९४५ मध्ये शिक्षणमहर्षी प्राचार्य एम. आर. देसाई आणि संसदपटू बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांनी “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” या तत्त्वज्ञानाने प्रेरित होऊन शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली.
१९६१ मध्ये वेंगुर्ल्यात महाविद्यालयाची स्थापना झाली. पुढे १९६५ मध्ये संस्थापक बॅरिस्टर खर्डेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्यात आले. त्या काळात कोकणात उच्च शिक्षण दुर्मिळ होते. मात्र या महाविद्यालयामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची नवी संधी मिळाली. सध्या महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रयोगशाळा, संगणक केंद्र, सुसज्ज ग्रंथालय, मुलींसाठी सुरक्षित वसतिगृह,तसेच करिअर काउन्सेलिंग सेंटर अशा सुविधा येथे उपलब्ध आहेत.महाविद्यालयाने वेळोवेळी अभ्यासक्रमात नवनवीन बदल स्वीकारले. पदवी शिक्षणासोबतच इको-टुरिझम कोर्स, ग्रीन नेचर क्लब, महिला विकास कक्ष, अॅड-ऑन कोर्सेस यांद्वारे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडवले जाते. प्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवले. या कामगिरीमागे शिक्षण प्रसारक मंडळाचे नेतृत्व आहे. विद्यमान अध्यक्षा श्रीमती शिवानी देसाई, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे-देसाई, सचिव प्रा.जयकुमार देसाई, पेट्रन कन्सिल मेंबर दौलतराव देसाई, प्रशासकीय अधिकारी श्री. पृथ्वी मोरे, संस्था प्रतिनिधि सुरेंद्र चव्हाण यांचे मोलाचे योगदान आहे. प्राचार्य डॉ. डी. बी. गोस्वामी म्हणाले, आपण मिळवलेला पुरस्कार हा केवळ शिक्षक-विद्यार्थ्यांच्या नव्हे तर आमच्या माजी विद्यार्थ्यांच्या प्रेरणा व सहकार्याचाही फलित आहे.”
…………..
वेंगुर्ल्यातील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाने मिळवलेला “सर्वोत्तम महाविद्यालय” पुरस्कार म्हणजे कोकणातील ग्रामीण शिक्षणाची ऐतिहासिक कामगिरी आहे.हा बहुमान केवळ महाविद्यालयाचाच नाही तर वेंगुर्ला आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अभिमान आहे.’
- प्रॉ. डॉ. मंजिरी मोरे, चेअरमन शिक्षण प्रसारक मंडळ