महापालिकेतील तीन बडया अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस ! प्रशासकाकडून कारवाई !!
schedule21 May 24 person by visibility 1865 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रस्त्यांंच्या कामातील त्रुटीला जबाबदार धरुन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आणि जल अभियंता हर्षजीत घाटगे यांना महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शहर अभियंता सरनोबत यांना रस्ते कामावरुन एका आठवडयात दुसऱ्यांदा कारणे दाखवा नोटीस निघाली आहे.
राज्य सरकारकडून कोल्हापुरातील रस्ते दुरुस्तीसाठी १०० कोटी रुपये निधी मंजूर आहेत. या निधीतून सोळा रस्ते होणार आहेत. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियाना (राज्यस्तर) अंतर्गत हा निधी मिळाला आहे. . सध्या पाच रस्त्यांचे काम सुरू आहे. यातील मिरजकर तिकटी ते नंगीवली चौक या रस्तेवर डांबरीकरणानंतर पुन्हा खुदाई केलेच्या तक्रारी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सोमवारी दुपारी रस्त्यांची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उप-शहर अभियंता सतिश फप्पे, आर.के.पाटील, महादेव फुलारी उपस्थित होते. या ठिकाणी आढळून आलेल्या कामातील त्रुटी या संबंधीत विभागामध्ये समन्वय नसलेचे प्रशासकांच्या निदर्शनास आले. यामुळे प्रशासकांनी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत व जल अभियंता हर्षजीत घाटगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत रस्त्यांच्या कामाची वर्क ऑर्डर सोलापूर येथील ठेकेदार मे.एवरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर्स अँड डेव्हलपर्स यांच्या नांवे मंजूर आहे. या मंजूर सोळा रस्त्यांपैकी पाच रस्त्याची कामे ठेकेदारामार्फत सुरु आहेत. यामधील कोळेकर तिकटी ते नंगीवली चौक, निर्मिती कॉर्नर ते कळंबा रोड, खरी कॉर्नर ते उभा मारूती चौक, माऊली चौक ते हुतात्मा चौक येथे कामे सुरू आहेत. या ठिकाणी ड्रेनेजचे मेनहोल, युटीलीटी व इतर बाबी डांबरीकर करताना समन्वया अभावी डांबरीकरणाच्या खाली गेल्याचे दिसून आले. यावेळी स्थानिक नागरीकांशी प्रशासकांनी संवाद साधला.
पाच् रस्तेतंर्ग निर्मिती कॉर्नर ते कळंबा रोड या ५९८ मीटर लांबीच्या रस्तेचे रुंदीकरणासह खडीकरण व डांबरीकरण करणेचे काम पूर्ण केलेले आहे. कोळेकर तिकटी ते नंगीवली चौक या ४०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. खरी कॉर्नर ते उभा मारूती चौक या रस्तेचे खडीकरण पूर्ण झालेले आहे. माऊली चौक ते हुतात्मा चौक ते विश्वजित हॉटेल लांबी १५०० मीटर या रस्तेचे युटीलिटी शिफटींग व खडीकरणाचे काम सुरू आहे.