अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला महाराष्ट्राचा पूर्ण विरोध, धनंजय महाडिकांनी घेतली केंद्रीय जलशक्तीमंत्र्यांची भेट
schedule22 May 25 person by visibility 78 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट घातला आहे. त्याला महाराष्ट्राचा पूर्ण विरोध आहे. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी, केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेतली. अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हयात महापूराचे संकट अतिगंभीर होवू शकते. तर कित्येक भूभाग कायमचा पाण्याखाली जावू शकतो. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्हयातील नागरिकांच्या अलमट्टी विरोधात तीव्र भावना आहेत. त्याबद्दल खासदार महाडिक यांनी, केंद्रीय मंत्र्यांसमोर वस्तुस्थिती मांडली.
बुधवारी मुंबईत मंत्रालयात जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत अलमट्टीच्या प्रस्तावित उंची वाढीला विरोध दर्शवण्यासाठी बैठक झाली. महाराष्ट्रासह आंध्र आणि तेलंगणा राज्याचाही अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध आहे. केंद्रीय लवादाने धरणाची उंची वाढवण्यास हिरवा कंदिल दिला असला तरी, वास्तविक स्वरूपात अलमट्टीची उंची वाढवणं व्यवहार्य नाही. त्यामुळेच अलमट्टीची उंची वाढवण्याचा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून, महाराष्ट्र सरकारने यापूर्वी सुध्दा धरणाच्या उंची वाढीला विरोध दर्शवला आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी कोणताही निर्णय दिलेला नाही. तर केंद्र सरकारने सुध्दा अलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंची वाढीला परवानगी दिलेली नाही. अशा परिस्थितीत कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करू नये. कोल्हापूर आणि सांगली जिल्हयातील हजारो नागरिकांच्या शेत जमीनी, घरे बुडवणार्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याला केंद्र सरकारने परवानगी देवी नये, अशी ठाम भूमिका खासदार महाडिक यांनी घेतली आहे. याप्रश्नी लवकरच एक व्यापक उच्चस्तरीय बैठक बोलावू आणि मार्ग काढू असे मंत्री पाटील यांनी सांगितले.