कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार
schedule20 Dec 23 person by visibility 328 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण शब्दबद्ध करणाऱ्या कादंबरीकार कृष्णात खोत यांना यंदाचा साहित्य अकदामीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य विश्वात अतिशय मानाचा हा पुरस्कार मानला जातो. खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला आहे. येत्या १२ मार्च २०२४ रोजी पुरस्कार वितरण सोहळा आहे. यापूर्वी त्यांना महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार मिळाला आहे. साहित्य अकादमीच्या पुरस्काराने खोत यांच्या लिखाणाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला.
साहित्य अकादमीचे सचिव डॉ. श्रीनिवासराव यांनी बुधवारी साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर केले. देशातील २४ भाषेतील उत्कृष्ट साहित्य निर्मिती करणाऱ्या लेखकांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. मराठीत कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या रिंगाण’ला तर कोकणी भाषेत प्रकाश पर्येकर यांच्या वर्सल या कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
खोत यांनी आपल्या लिखाणातून सातत्याने ग्रामसंस्कृती, बदलते खेडे, त्यांचा जीवनसंघर्ष मांडला आहे. यापूर्वी त्यांच्या, ‘गावठाण, रौंदाळा, झडझिंबड, आणि धूळमाती’या कादंबऱ्या वाचकप्रिय ठरल्या आहेत. ‘नांगरल्याविन भुई’हे ललित व्यक्तीचित्रण प्रकाशित आहे. त्यांनी, ‘रिंगाण’या कादंबरीत विस्थापितांचा संघर्ष मांडला आहे.
खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील आहेत. त्यांचे शिक्षण एमएबीड झाले आहे. शहाजी कॉलेजमधून बीए पूर्ण केले आहे. बीएड केल्यानंतर क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या शिक्षण संस्थेत काही वर्षे वसतिगृह रेक्टर म्हणून काम केले. नोकरी करत त्यांनी इतिहास, राज्यशास्त्र, मराठी विषयात एमए केले. पन्हाळा तालुक्यातील कळे येथील कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत.