उद्योगांसाठी वीज दराच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी संयुक्त समिती स्थापन
schedule27 Aug 25 person by visibility 52 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन : उद्योगांसाठी वीज दराच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये उद्योजकांचे प्रतिनिधी व महावितरणच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल. या समितीच्या अभ्यास गटामार्फत दोन महिन्यात उपाययोजना सुचवाव्यात असे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डींकर यांनी सांगितले.
मुंबई येथील एमएसईबी होल्डिंग कंपनी कार्यालय येथे नुकतीच उद्योजकांच्या संघटनेसोबत राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली झाली. यावेळी आमदार सत्यजित तांबे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे संचालक योगेश गडकरी, संचालक (प्रकल्प) सचिन तालेवार, संचालक सतीश चव्हाण, एम एस ई बी होल्डिंग कंपनी तसेच महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या, महाराष्ट्रात प्रथमच वीज दर कमी होत आहे मात्र औद्योगिक ग्राहकांना शासन स्तरावर अजून वीज दराबाबत काय लाभ देता येतील, याकरिता सदर समितीच्या माध्यमातून उद्योजकांच्या वीज दराबद्दल असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी नाशिक येथील निमा या उद्योजकांच्या संघटनेचे प्रतिनिधी आणि महापारेषण, महावितरणच्या अधिकाऱ्यांचा अभ्यास गट स्थापन करण्यात येणार आहे. या अभ्यास गटामार्फत सदर वीज पुरवठा व विजेचे दर या अनुषंगाने असलेल्या मागण्या व त्यादृष्टीने उपाय सुचविण्यात येतील. या उपाययोजनांचा उपयोग उद्योगांच्या वीजदर समस्या दूर करण्यासाठी होईल तसेच या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येईल. आमदार तांबे यांनी यावेळी उपाययोजनांबाबत उद्योजक व अधिकारी यांच्या अभ्यास गटाने लवकरात लवकर उपाययोजना सुचवाव्यात या दृष्टीने गरज व्यक्त केली.