दाखल्याप्रकरणी तीन शाळांना कारणे दाखवा नोटीस ! विद्यार्थी आंबेवाडीतील शाळेत, दाखले कोल्हापूर-शाहूवाडीतील शाळेत !!
schedule28 Aug 25 person by visibility 195 categoryशैक्षणिकलाइफस्टाइल
दोषीवर कडक कारवाई होणार –कार्तिकेयन एस
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शाळा हस्तांतरण व स्थलांतरण प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाची परवानगी न घेणे, विद्यार्थी एका शाळेत आणि दाखले दुसऱ्या शाळेत असा प्रकार आढळून आल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तीन शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शुक्रवारपर्यंत (२८ ऑगस्ट २०२५) त्यांना म्हणणे सादर करण्याची मुदत आहे. ४३ दाखले दिले असल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी संबंधितांचे म्हणणे सादर झाल्यानंतर, दोषी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी सांगितले. वरणगे पाडळी येथे ग्लोरियस इंग्लिश मिडियम स्कूलची स्थापना २००९ मध्ये झाली. ही स्वयंअर्थसहाय्यित शाळा आहे. महादेव बांगडे यांनी या शाळेची सुरुवात केली. दरम्यान काही वर्षांनी ही शाळा आंबेवाडी येथे स्थलांतरित झाली. सध्या या शाळेची मालकी ज्योती शिपेकर यांच्याकडे आहे. दरम्यान शाळा स्थलांतरण व हस्तांतरण प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाची मान्यता महत्वाची असते. मात्र या दोन्ही प्रक्रियेसाठी रितसर मान्यता घेण्यात आली नसल्याचे तपासात समोर आले.
दरम्यान या शाळेकडून विद्यार्थ्यांचे दाखले अन्य शाळेत दिले असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. विद्यार्थी आंबेवाडी शाळेत आणि त्यांचे दाखले मात्र कोल्हापूर शहरातील शाळांकडे असा प्रकार सुरू होता. या साऱ्या प्रकारची चौकशी करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती. प्राथमिक शिक्षण विभागातील अधीक्षक उदय सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली या समितीत शिक्षण विस्तार अधिकारी डी. सी. कुंभार, शिक्षण विभागातील अधीक्षक विजय कोचरी यांचा समावेश होता. या समितीने चौकशी अहवाल प्रशासनाला सादर केला आहे.
या चौकशी समितीने हस्तांतरण व स्थलांतरण प्रक्रियेला मान्यता घेतली नसल्याचे म्हटले आहे. तसेच आंबेवाडी शाळेत मुले असताना त्यांचे दाखले मात्र कोल्हापूर शहरातील सावित्री श्रीधर विद्यालय व शाहूवाडी तालुक्यातील सरस्वती विद्यालय तुरुकवाडी येथे दिले आहेत. सावित्री श्रीधर विद्यालयकडे २० दाखले आहेत तर तुरुकवाडी विद्यालयाकडे २३ विद्यार्थ्यांचे दाखले दिले आहेत. शिक्षण विभागाचे नियम पायदळी तुडवून हा सारा प्रकार घडला आहे. या कारणास्तव ग्लोरियस इंग्लिश मिडियम स्कूल, सावित्री श्रीधर विद्यालय व सरस्वती विद्यालय तुरुकवाडीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २९ ऑगस्ट २०२५ पर्यंत म्हणणे सादर करण्याच्या सूचना आहेत.