ग्रामीण भागातील युवती-महिलांनी कौशल्य प्राप्त करून प्रगती साधावी : राजेंद्र चव्हाण
schedule05 Aug 25 person by visibility 30 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संगणक, एआय, फॅशन डिझायन, हर्बल प्रॉडक्ट अशा कोर्सेसमधून कौशल्य प्राप्त करून ग्रामीण भागातील युवती व महिलांनी स्वतः सोबत कुटुंबाची प्रगती करत शाश्वत विकासाचे ध्येय गाठावे असे प्रतिपादन इनसाईट कॉम्प्युटर इन्स्टिटय़ूट राधानगरीचे प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी केले.
मांगेवाडी येथील स्वजन ज्ञान केंद्र,रीड इंडीया नवी दिल्ली संस्थेच्या 'स्किल टू सक्सीड' कार्यक्रमांतर्गत संगणक व फॅशन डिझाईन कोर्सच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. स्थानिक समिती प्रमुख अरुणा मगदूम या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. 'रीड इंडिया ' या संस्थेचे ६० केंद्र मांगेवाडी येथे सुरू केले आहे. केंद्राचा उद्देश राधानगरी परिसरातील दुर्गम भागातील ग्रामस्थांचा विशेषत: महिला व युवक यांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे असे सामाजिक कार्यकर्ते सुहास चौगले यांनी सांगितले. 'स्किल टू सक्सीड' कार्यक्रमांतर्गत कोणकोणत्या कोर्सेसना यावर्षी प्राधान्य राहील याबाबत माहिती रीड इंडिया चे महाराष्ट्र सल्लागार विजय रानमाळे यांनी दिली. प्रशिक्षक छाया पाटील यांनी माहिती दिली केले.शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय तिटवेचे उपप्राचार्य सागर शेटगे यांनी उपस्थितांना संगणकीय शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपसरपंच सातापा मगदूम, उद्योजक सागर मगदूम, सतिश कांबळे उपस्थित होते. केंद्राच्या समन्वयक मेघाराणी रानमाळे यांनी सूत्रसंचालन केले. संगणक प्रशिक्षक सुहास पाटील मांगोलीकर यांनी आभार मानले.