स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या डिसेंबर-जानेवारीत –राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
schedule05 Aug 25 person by visibility 233 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या महिन्यात होतील अशी शक्यता राज्याचे निवडणूक विभागाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केली आहे. वाघमारे यांची नाशिक येथे पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दिवाळीनंतर अर्थात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक प्रक्रियेला सुरुवात हाईल असे संकेतही दिले.
आयुक्त वाघमारे म्हणाले, ‘अपुऱ्या मनुष्यबळामुळे निवडणुका एकत्रित घेता येणार नाहीत. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या टप्प्याटप्प्याने होतील. मात्र कोणत्या निवडणुका पहिल्यांदा होतील हे अजून निश्चित केले नाही. दरम्यान एक जुलै २०२५ च्या मतदार यादीच्या आधारे निवडणुका घेण्यात येणार आहेत. या निवडणुकांमध्ये व्हीव्ही-पॅट मशिन वापरण्यात येणार नाहीत.’
राज्यातील तब्बल ६८७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत.अनेक नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषद व महापालिका सभागृहाची मुदत संपली आहे. सभागृहाची मुदत संपून साधारणपणे तीन ते पाच वर्षाचा कालावधी उलटला आहे. यामुळे या निवडणुका केव्हा होणार ? हा सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दिलेल्या आदेशात २८ टक्के ओबीसी आरक्षणानुसार नव्या प्रभाग रचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असे म्हटले आहे. त्या आदेशानुसार निवडणूक विभागाने प्रशासकीय तयारी सुरू केली आहे. यामुळे दिवाळीनंतर निवडणुकीचे बिगुल वाजणार हे स्पष्ट झाले.