चौकशी समितीवर होणार शिस्तभंगाची कारवाई, शालेय पोषण आहार प्रकरण : शिक्षण उपसंचालक महेश चोथे
schedule06 Aug 25 person by visibility 32 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शहरातील शालेय पोषण आहार गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीने कोणत्याही प्रकारच्या चौकशीचे काम केले नाही. यामुळे चौकशी समितीच्या अध्यक्षा व प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, उदय सरनाईक, वसुंधरा कदम यांच्यावर आठ दिवसात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीला दिली. तसेच येत्या आठ दिवसात गैरव्यवहाराची चौकशी करुन अहवाल जाहीर करू असेही त्यांनी सांगितले. शिष्टमंडळात अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत सुर्यवंशी, चंद्रकांत पाटील, राजाभाऊ मालेकर, सदानंद सुर्वे, बाबा वाघापूरकर, प्रकाश आमते, केशव लोखंडे, रवींद्र कांबळे, आण्णाप्पा खमलेहटटी, राजेश वरक, महेश जाधव आदींचा समावेश होता. शहरातील शालेय पोषण आहारात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी होत्या.या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दोन जुलै २०२५ रोजी चौकशी समिती नेमून आठ दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. मात्र या विषयी चौकशी समितीच लवकर नेमली नव्हती. कृती समितीने यासंबंधी शिक्षण उपसंचालकांची जुलै महिन्यात भेट घेतली होती. याप्रसंगी शिक्षक निरीक्षक समरजित पाटील व सहायक संचालक स्मिता गौड यांनी चौकशी समिती नेमण्याची ग्वाही दिली. या साऱ्या विषयाला एक महिना झाला. या कालावधीत चौकशी समितीने काय चौकशी केली ? असा सवाल कृती समितीने केला. तसेच चौकशीस विलंब लावणाऱ्या समितीवर कारवाई करावी अशी मागणी केली.