राजेश क्षीरसागर आले अन अर्ध्या तासात खंडित झालेला गॅस पुरवठा सुरळीत
schedule11 Oct 25 person by visibility 94 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील संदीप गॅस एजन्सी यांच्यामार्फत भागामध्ये होणारा गॅस पुरवठा गेल्या अनेक दिवसापासून खंडित असल्याने नागरिकांनी शनिवारी सकाळी गॅस टाक्या रस्त्यावर ठेवून रास्ता रोको केला. गॅस कंपनीचा गलथान कारभारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होवून संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान याच मार्गावरून कागल दौऱ्यासाठी निघालेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपला ताफा थांबवुन संबंधित घटनेची माहिती घेतली. यावेळी नागरिकांनी गॅस वितरकाविषयी असलेल्या संतप्त भावना आमदार क्षीरसागर यांच्यासमोर व्यक्त केल्या. संबंधित गॅस एजन्सी मार्फत गॅस वितरण कंपनीला पैसे भरले नसल्यामुळे कंपनीकडून गॅस पुरवठा झालेला नाही. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात गॅस वितरण होत नाही, यात एजन्सी दोषी असल्याचे मत नागरिकांनी मांडले.
याबाबत तात्काळ आमदार क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, तसेच एचपी गॅस एजन्सीचे सेल्स मॅनेजर यांच्याशी फोनवरून संपर्क करून तात्काळ गॅस पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या. तसेच घटनेची कायदेशीर चौकशी करून सदर एजन्सी जर वितरणास पात्र नसेल, तर एजन्सी दुसऱ्याला देण्यात यावी, पण कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना त्रास होता कामा नये, अशा सक्त सूचनाही दिल्या. यावेळी गॅस वितरक कंपनीकडून पुढील अर्ध्या तासात गॅस पुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांना देण्यात आली. यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेत आमदार क्षीरसागर यांच्या कार्यतत्परतेबद्दल आभार व्यक्त केले. यानंतर पुढील अर्ध्या तासात कंपनीकडून गॅस वितरण सुरळीत सुरू झाले.