रंकाळयाचे नुकसान करू नका, तलावाचे सौंंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच ! राजेश क्षीरसागर
schedule12 Oct 25 person by visibility 165 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ रंकाळा तलावाचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी साऱ्यांची आहे. फेरीवाल्यांनीही शिस्त पाळावी आणि अधिकाऱ्यांनी समन्वय साधून अन्यायकारक कारवाई टाळावी.’अशा स्पष्ट सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या. गेल्या काही दिवसांपूर्वी रंकाळ्यात कचरा, नासाडी झालेले अन्न टाकण्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. ही गंभीर बाब असून, रंकाळा तलावाचे कोणीही नुकसान करत असेल तर त्याला पाठीशी घातले जाणार नाही असेही बजावले.
गेल्या दोन दिवसांपासून रंकाळा येथील संध्यामठ परिसरातील फेरीवाल्यांवर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईबाबत फेरीवाल्यांनी आमदार क्षीरसागर यांच्याकडे दाद मागितली. या पार्श्वभूमीवर आमदार क्षीरसागर यांनी संध्यामठ परिसरात भेट देवून फेरीवाले आणि अधिकारी यांच्यात समन्वय घडवून आणला. यावेळी भागातील रहिवासी नागरिकांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासमोर पार्किंग, वाहतुकीच्या कोंडी, कचरा उठावाबाबत मत व्यक्त केले. यावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संवाद साधून वाहतुकीची कोंडी होवू नये, अनधिकृत पार्किंग होवून नये यासाठी रंकाळा मेन रोड परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त नेमण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त रमाकांत अडसूळ यांच्याशी संपर्क साधून नव्याने होणाऱ्या शहर विकास आराखड्यात रंकाळा स्टँड ते फुलेवाडी आणि क्रशर चौक ते जावळाचा गणपती चौक असा जोड उड्डाणपूल प्रस्तावित करण्याच्या सूचना दिल्या. यासह मंजूर असलेल्या निधीतून रंकाळा परिसरात आवश्यक सर्व ठिकाणी ओला व सुका कचऱ्याचे गारबेज कलेक्टर तात्काळ बसविण्याच्या सूचना दिल्या. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, महानगरपालिका इस्टेट अधिकारी विलास साळोखे, पंडित पोवार, बंटी साळोखे, संग्राम जरग, कपिल साठे अजित साळोखे, शिवराज पोवार, संजय निगवेकर, काकाजी मोहिते, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.