प्रभारी कुलगुरू सुरेश गोसावींनी कार्यभार स्वीकारला
schedule11 Oct 25 person by visibility 581 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: सुसंवाद, विश्वास आणि पारदर्शकता या मूल्यांवर आधारित कार्य करून शिवाजी विद्यापीठाचा लौकिक वृद्धिंगत करण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू या, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू असलेल्या डॉ. गोसावी यांनी शनिवारी 11 ऑक्टोंबर रोजी शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लगेच कामकाजाला सुरवात केली.
कुलगुरू डॉ. गोसावी यांनी सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करून मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर कुलगुरू दालनामध्ये प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी अर्चना गोसावी याही उपस्थित होत्या.
कार्यभार स्वीकारल्यानंतर कुलगुरू डॉ. गोसावी यांचे विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने व्यवस्थापन परिषद सभागृहात औपचारिक स्वागत करण्यात आले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि ग्रंथभेट देऊन कुलगुरूंचे सपत्नीक स्वागत करण्यात आले.
यानंतर उपस्थितांना संबोधित करताना कुलगुरू डॉ. गोसावी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव लाभलेल्या आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारकार्याचा वारसा लाभलेल्या हीरकमहोत्सवी शिवाजी विद्यापीठाचा प्रभारी कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी लाभली, याबद्दल अतिशय आनंद वाटत आहे. ही संधी दिल्याबद्दल कुलपती महोदयांचे आभार मानतो. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा प्रभारी कुलगुरू म्हणून काम करण्याची संधीही मला लाभली होती. त्यामुळे फुले, आंबेडकर आणि शाहू या त्रयींच्या संगमावर काम करता आले, याचे समाधानही वाटते. शिवाजी विद्यापीठाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला लौकिक प्रस्थापित केला आहे. हा लौकिक वृद्धिंगत करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू या, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, संगणक केंद्र संचालक अभिजीत रेडेकर, माजी अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. मेघा गुळवणी, व्यवस्थापन परिषद सदस्य स्वागत परुळेकर, डॉ. मंजिरी मोरे, अधिसभा सदस्य धैर्यशील यादव, डॉ. निखिल गायकवाड, डॉ. सुभाष कोंबडे, डॉ. किरण कुमार शर्मा, डॉ. राहुल माने, उपकुलसचिव डॉ. वैभव ढेरे, पुणे विद्यापीठाचे उपकुलसचिव प्रदीप कोळी आणि सुरेश भोसले आदी उपस्थित होते.