शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशयातील साडेसहा किलो वजनाचे फायब्रॉईड काढले
schedule11 Oct 25 person by visibility 304 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन कोल्हापूर : मातृबल हॉस्पिटल, कोल्हापूर येथे अलीकडेच एक अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. या शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशयातील तब्बल 6.7 किलो वजनाचे प्रचंड फायब्रॉईड यशस्वीरित्या काढण्यात आले आहे.
रुग्णाला गेल्या आठ महिन्यांपासून पोटात जडपणा, सतत वाढणारी सूज, पोटदुखी, तसेच श्वास घेण्यास त्रास अशी गंभीर लक्षणे जाणवत होती. तपासणीदरम्यान आणि सीटी स्कॅननंतर डॉक्टरांना कळाले की रुग्णाच्या गर्भाशयातून अत्यंत मोठा ट्यूमर विकसित झाला आहे, जो पूर्ण पोट व्यापून डायाफ्रॅमपर्यंत पोहोचला होता.
सर्व आवश्यक रक्त तपासण्या आणि प्री-ऑपरेटिव्ह मूल्यांकन केल्यानंतर, मातृबल हॉस्पिटलच्या अनुभवी तज्ञ डॉक्टरांच्या टीमने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही अत्यंत आव्हानात्मक शस्त्रक्रिया डॉ. एम. जे. नागांवकर, डॉ. रूपा नागांवकर, डॉ. नंदन नागांवकर आणि डॉ. सायली नागांवकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. शंकर आमणगी आणि डॉ. विश्वास जोशी, तसेच फिजिशियन म्हणून डॉ. रमेश कुर्ले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी पाहिले की फायब्रॉईड अतिशय प्रचंड आकाराचे असून, आतड्यांवर, मूत्राशयावर व इतर अंतर्गत अवयवांवर दाब आणत होते. अतिशय काळजीपूर्वक आणि कौशल्यपूर्णरीत्या फायब्रॉईड वेगळे करून पूर्णपणे काढण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर राहिली असून ती सध्या पूर्णपणे बरी आहे.
या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल बोलताना डॉ. एम. जे. नागांवकर यांनी सांगितले, की अशा प्रकारच्या प्रकरणात शस्त्रक्रिया करणे अत्यंत आव्हानात्मक असते. फायब्रॉईडचा आकार आणि त्याचे पोटातील इतर अवयवांशी असलेले निकट संबंध लक्षात घेता अत्यंत सूक्ष्म नियोजन आणि समन्वयाची आवश्यकता होती. आमच्या संपूर्ण टीमच्या समन्वयामुळे हे यश शक्य झाले.”
डॉ. रूपा नागांवकर म्हणाल्या,"महिलांमध्ये फायब्रॉईड हा एक सर्वसाधारण विकार असला तरी काही वेळा ते प्रचंड आकाराचे होऊ शकतात. वेळेवर निदान आणि योग्य उपचार केल्यास अशा गुंतागुंती टाळता येतात. महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करणे अत्यावश्यक आहे."