जलजीवन मिशनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात, चार महिन्यापासून मानधन थकीत
schedule11 Oct 25 person by visibility 382 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन : जल जीवन मिशन अंतर्गत कार्यरत जिल्हा तज्ञ, बीआरसी (गट संसाधन केंद्र) कर्मचारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यांपासून मानधन थकीत आहे. परिणामी, या सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रभरातील हे सर्व कर्मचारी जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन या केंद्र पुरस्कृत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सातत्याने काम करीत आहेत. मात्र, जुलै 2025 पासून आजपर्यंतचे मानधन मिळालेले नाही, त्यामुळे आर्थिक संकटात भर पडली आहे.
कर्मचाऱ्यांनी सांगितले की, “आम्ही वेळोवेळी राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाशी संपर्क साधला असता, केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झालेला नाही म्हणून मानधन देणे शक्य नाही,” अशी उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तसेच प्रधान सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन यांना निवेदन सादर करून मानधन तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे.
कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, “वेळेवर मानधन मिळाले नाही, तर दिवाळी सणाच्या काळात आमचे घर अंधारात राहील.” जिल्हा व तालुकास्तरीय स्तरावर काम करणारे हे कर्मचारी अत्यल्प मानधनावर काम करतात. या मानधनातूनच घरगुती खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्यावरील खर्च भागवावा लागतो. त्यामुळे सध्या त्यांच्यावर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला आहे.
कर्मचाऱ्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की, या विषयाकडे संवेदनशीलतेने पाहून तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांनी दिवाळी सण आनंदात साजरी करता येईल.