पंचगंगा कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त, मे महिन्यात नव्याने निवडणुका
schedule04 Apr 25 person by visibility 58 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केंद्रीय सहकार खात्याने देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. त्याचवेळी नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. निवडणुकीच्या नव्या कार्यक्रमानुसार ११ मे २०२५ रोजी मतदान आणि बारा मे रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान केंद्रीय सहकार खात्याच्या य आदेशाने कारखान्याचे विद्यमान चेअरमन पी. एम. पाटील यांना धक्का बसला.
जानेवारी २०२५ मध्ये पंचगंगा कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीत सत्तारुढ गटाने १७ पैकी १७ जागा बिनविरोध केल्या होत्या. दरम्यान कारखान्याचे माजी अध्यक्ष रजनी मगदूम यांनी कारखान्याची झालेली पंचवार्षिक निवडणूक बेकायदेशीर होती. चुकीच्या पद्धतीने विरोधकांचे अर्ज बाद केले होते असा आक्षेप नोंदवित होते. तसेच त्यांनी केंद्रीय सहकार खात्याकडे तक्रार केली होती. त्या निवडणुकीत विरोधकांचे सर्व अर्ज बाद ठरविले होते. वार्षिक सभेला गैरहजर, उमेदवारांच्या सूचक-अनुमोदकांकडून दरवर्षी ऊस पुरवठा न होणे या कारणावरुन अर्ज बाद ठरविले होते.
केंद्रीय सहकार खात्याने या तक्रारीची दखल घेत संचालक मंडळ बरखास्त करत नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश दिले. केंद्रीय सहकार खात्याच्या आदेशानुसार नव्याने निवडणूक कार्यक्रम होत आहे. यामध्ये २९ एप्रिल ते ३ मे या कालावधीत अर्ज भरणे, पाच मे रोजी अर्जांची छाननी, सहा मे अर्ज माघारी असा निवडणूक विषयक कार्यक्रम आहे.