जयप्रभा संवर्धन-सुशोभीकरणाचा प्रस्ताव सादर करा - उपमुख्यमंत्र्यांच्या महापालिका आयुक्तांना सूचना
schedule09 Apr 25 person by visibility 92 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जयप्रभा स्टुडीओ टिकवणं म्हणजे केवळ इतिहास जपणे असे नव्हे तर चित्रपट निर्मितीची संस्कृती टिकवण्याची जबाबदारी आहे. याठिकाणी पूर्ण क्षमतेने चित्रीकरण होण्यासाठी ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन, सुशोभिकरण आणि चित्रीकरणासाठी आवश्यक अत्याधुनिक यंत्रणा, सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता एक कोटी निधीची तरतूद करावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी गेल्या आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती. याबाबत जयप्रभा स्टुडिओच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी आवश्यक निधी मागणी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त यांना दिल्या आहेत.
आमदार क्षीरसागर यांनी, जयप्रभा स्टुडीओच्या मूळ जागेत चित्रीकरण करण्याचा गेल्या काही महिन्यात कलाकारांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. याठिकाणी लाईट, कॅमेरा, अॅक्शनचा आवाज पुन्हा घुमला. परंतु, याठिकाणी चित्रीकरणासाठी अत्यंत अपुऱ्या सुविधा असल्याने चित्रीकरणात अडथळे निर्माण होत दिसून येते. या कलाकारांना आवश्यक अत्याधुनिक यंत्रणा, सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला सर्वतोपरी प्रयत्न असून, या वास्तूचे संर्वधन देखील तितकेच महत्वाचे असल्याने स्टुडीओची तात्काळ डागडुजी व कलाकारांना मुलभूत सोई- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्र शिंदे यांच्याकडे एक कोटी रुपयांचा निधी मागितला असून, याबाबत शासन सकारात्मक आहे. यासह जयप्रभा पुन्हा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून आणखी दहा कोटी रुपयांच्या निधीची मागणी करणार आहे. येत्या काळात येथे चित्रिकरणाचा ओघ पुन्हा सुरु झाल्याचे दिसून येईल.