जाधव गुरूजींच्या निरुपणाने तुकाराम गाथेच्या अभ्यासाची परंपरा समृध्द- विचारवंत डॉ.सदानंद मोरे
schedule09 Apr 25 person by visibility 144 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘मारूतीराव जाधव (तळाशीकर) गुरूजींच्या गाथेचे प्रकाशन होणे ही फार मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. या गाथेचे प्रचार आणि प्रसार हळूहळू संपूर्ण राज्यभर होणार आहे, ही सुखावणारी गोष्ट आहे. जाधव गुरूजींच्या निरूपणाने तुकाराम गाथेच्या अभ्यासाची परंपरा समृध्द केली.’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांनी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्यावतीने आयोजित २०२४ साठीचा पहिला पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील पुरस्कार आणि सद्गुरू डॉ.गुरूनाथ मुंगळे आध्यात्मिक तत्वज्ञान साहित्य पुरस्कार वितरण सोहळा विद्यापीठाच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहामध्ये सकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोरे बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के उपस्थित होते. प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीस पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील पुरस्कार स्व.तळाशीकर गुरूजी यांच्यावतीने श्रीमती आनंदी मारूतीराव जाधव यांनी स्विकारला. तर, सद्गुरू डॉ.गुरूनाथ मुंगळे आध्यात्मिक तत्वज्ञान साहित्य पुरस्कार आय.आय.टी.कानपूर उत्तर प्रदेश येथील प्रा.समीर चव्हाण यांना प्रदान करण्यात आले.
डॉ. मोरे पुढे म्हणाले, संत नामदेव, संत तुकोबा, संत एकनाथ महाराज यांनी संत परंपरा कायम ठेवली. महाराष्ट्र राज्यामध्ये वैचारीक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, अध्यात्मीक जडण-घडणीमध्ये सांप्रदायिक समाजाचा विस्तार करण्यामध्ये संत ज्ञानोबांचा-तुकोबांचा मोठा वाटा आहे. संत परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्याला देशामध्ये अग्रेसर करावयाचे असेल तर सर्व संतांना एकत्र ठेवणे आवश्यक आहे. सर्व संतांनी आपणांस फार मोठी दिशा दाखविलेली आहे. आजही संत साहित्य अभ्यासणे आणि त्याचा योग्य तो अर्थ लावणे आवश्यक आहे. महाराष्ट्राबाहेर उत्तर प्रदेशातील कानपूरमधील आय.आय.टी.सारख्या आधुनिक वैज्ञानिक संस्थेमध्ये कार्य करीत असताना तुकोबांच्या अभंगाचा सखोल विचार करून डॉ.समीर चव्हाण यांनी खंड प्रकाशित करून पुरस्कार प्राप्त केलेला आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू शिर्के म्हणाले, संत साहित्यामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल स्व.तळाशीकर गुरूजी यांना पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर, सद्गुरू डॉ. मुंगळे हे पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांचे अध्यात्मिक गुरू असा हा गुरू-शिष्यांच्या नावाचा पुरस्कार दिला जात आहे, हा दुग्धशर्करा योग आहे. याप्रसंगी गौरी कहाते (सोलापूर), अरूण जाधव (तळाशी), डॉ.समीर चव्हाण (कानपूर) आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.अरूण जाधव आणि श्रीमती आनंदी मारूतीराव जाधव, तळाशीकर गुरूजींच्या आठवणीने भाऊक झाले होते. कार्यक्रमास माजी खासदार प्रा.संजय मंडलीक, डॉ.प्रतापराव माने, गोकुळचे चेअरमन अरूण डोंगळे उपस्थित होते. संत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख डॉ.नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले.मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.रणधीर शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी आभार मानले.