19 संचालक एकसंघ, आघाडीच्या नेतेमंडळीच्या मार्गदर्शनाखालीच काम ! अरुण डोंगळे एकाकी ?
schedule15 May 25 person by visibility 450 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : चेअरमन अरुण डोंगळे यांनी चेअरमनपदावरुन बंडाचा झेंडा उभारल्यानंतर गोकुळ दूध संघातील सत्ताधारी ‘राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी’च्या १९ संचालकांनी एकत्र येत एकसंघ दाखविला. तसेच सत्तारुढ आघाडीच्या नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत, पुढेही काम करत राहू’अशी ग्वाही त्यांनी दिली. सत्ताधारी आघाडीतील सगळे संचालक एकवटल्यामुळे चेअरमन डोंगळे हे एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे.
सत्ताधारी आघाडीच्या १९ संचालकांनी गुरुवारी सकाळी, ताराबाई पार्क येथील कार्यालयात एकवटले. येथे त्यांनी संचालकांची मिटींग घेतले. या बैठकीला ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अभिजीत तायशेटे, अजित नरके, नाविद मुश्रीफ, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रा. किसन चौगले, रणजीत पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, एस. आर. पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंजना रेडेकर हे निवडून आलेले सदस्य उपस्थित होते. तर नियुक्त संचालकापैकी युवराज पाटील, राजेंद्र मोरे यांनी बैठकीत सहभाग घेतला. नियुक्त संचालक मुरलीधर जाधव हे कौटुंबीक कार्यक्रम असल्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र ते गोकुळमधील सत्ताधारी आघाडीसोबत आहेत असे सांगण्यात आले. या बैठकीला संचालक अंबरिश घाटगेही उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले, ‘गोकुळमध्ये पक्षीय राजकारण नाही. महाविकास आघाडी आणि महायुती असा प्रकार नाही. सर्वपक्षीय एकत्र आहोत. राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी’म्हणून आम्ही निवडणूक जिंकून सत्तेवर आहोत. गोकुळमधील सत्ताधारी आघाडीच्या नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहू. चेअरमन डोंगळे यांच्यासंबंधी नेते मंडळी जो निर्णय घेतली, कामकाजासंबंधी आम्हाला जो आदेश देतील तसे काम करू.’
ताराबाई पार्क येथील बैठक संपल्यानंतर हे सगळे संचालक गोकुळ शिरगाव येथील गोकुळ प्रकल्प कार्यालयात आयोजित बोर्ड मिटिंगसाठी दाखल झाले. संचालकांच्या बोर्ड मिटिंगसाठी विरोधी आघाडीतून निवडून आलेले संचालक शौमिका महाडिक, चेतन नरके, बाळासाहेब खाडे हे देखील उपस्थित होते. चेअरमन डोंगळे यांनी वैयक्तिक कारणास्तव रजेवर असल्याचे पत्र दिले होते. त्यांच्या गैरहजेरीत बैठकीच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड झाली.
……………..
“ गोकुळ सारख्या मोठया संस्थेला राज्य सरकारची मदत मोलाची ठरत असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळचा अध्यक्ष हा महायुतीचा असावा असे म्हटले आहे. त्यांनी चेअरमनपदाचा राजीनामा देऊ नका असे सांगितले आहे. यामुळे मी, चेअरमनपदाचा राजीनामा देणार नाही. गोकुळच्या बोर्ड मिटिंगला वैयक्तिक कामकाजामुळे मी उपस्थित राहू शकत नाही. मी रजेवर असल्याचे प्रशासनाला कळविले आहे. ”
- अरुण डोंगळे, चेअरमन गोकुळ दूध संघ
- ……………………………..