बारावी परीक्षेत कोल्हापूर विभाग राज्यात द्वितीय ! एक लाख सहा हजार चार विद्यार्थी उत्तीर्ण !!
schedule05 May 25 person by visibility 175 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे फेब्रुवारी –मार्च २०२५ मध्ये झालेल्या बारावी परीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल ९३.६४ टक्के इतका लागला. निकालात संपूर्ण राज्यात कोल्हापूर विभाग द्वितीय स्थानावर आहे. कोकण विभाग ९६.७४ टक्के गुण प्राप्त करत अव्वल स्थानावर आहे. कोल्हापूर विभागाच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत ०.६० टक्क्यांनी इतकी घट आहे. गेल्या वर्षी कोल्हापूर विभागाचा निकाल ९४.२४ टक्के इतका होता.
शिक्षण मंडळातर्फे सोमवारी (पाच मे २०२५) बारावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत झाली होती. . कोल्हापूर विभागाच्या निकालाची माहिती विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिक्षण उपसंचाल कार्यालयातील सहायक उपसंचालक स्मिता गौड, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, बोर्डाच्या कोल्हापूर विभागाचे सहसचिव बी. एम. किल्लेदार आदी उपस्थित होते.
कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यातील १०१२ कनिष्ठ महाविद्यालयातील १७६ केंद्रावर परीक्षा झाली. तीन जिल्ह्यात मिळून एक लाख १ ३ हजार १९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी एक लाख सहा हजार चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल हा ९४.४० टक्के इतका आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ४८ हजार ८३६ विद्यार्थी प्रविष्ठ होते, त्यापैकी ४६ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सांगली जिल्ह्यात ३१ हजार २०२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी उत्तीर्ण विद्यार्थी संख्या २९ हजार १४५ इतकी आहे. सांगली जिल्हयाचा एकूण निकाल ९३.३९ टक्के आहे. सातारा जिल्ह्यातील परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३३ हजार १५२ आहे. यापैकी उत्तीर्ण विद्यार्थी ३० हजार ७५४ आहेत. सातारा जिल्हयाचा निकाल ९२.७६ टक्के आहे.
………
मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ६.२१ टक्कयांनी अधिक
यंदा, मुली आणि मुलांच्या उत्तीर्णतेत तुलनात्मक स्थिती पाहिली तर मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ६.२१ टक्के अधिक आहे. कोल्हापूर विभागातील उत्तीर्ण मुलांची संख्या ५४ हजार १८१ इतकी आहे. उत्तीर्ण मुलींची संख्या ५१ हजार ८२६ आहे. यंदा ५३ हजार ४६९ मुलींनी परीक्षा दिली होती. तर परीक्षा दिलेल्या मुलांची संख्या ५९ हजार ७२६ इतकी आहे.
…………….
राज्याच्या निकालावर एक दृष्टीक्षेप
राज्यातील नऊ विभागीय मंडळातर्फे बारावीची परीक्षा झाली. यामध्ये पुणे (९१.३१), नागपूर (९०.५२ टक्के), छत्रपती संभाजीनगर (९२.२४), मुंबई (९२.९३ टक्के ), कोल्हापूर (९३.६४ टक्के), अमरावती (९१.४३ टक्के), नाशिक(९१.३१ टक्के), लातूर (८९.४६ टक्के) व कोकण ९६.७४ टक्के इतका आहे. बारावी परीक्षेस राज्यातील एकूण १४ लाख २७ हजार ०८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यापैकी १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या १३ लाख दोन हजार ८७३ इतकी आहे. राज्यातील उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ९१.८८ टक्के आहे.