कोल्हापूरच्या क्रीडाक्षेत्राच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्यासोबत संयुक्त बैठक-प्रकाश आबिटकर
schedule29 Aug 25 person by visibility 39 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊ. तसेच जिल्ह्यातील तीनही खासदारांनी केंद्र सरकारच्या क्रीडा विषयक योजना कोल्हापुरात आणाव्यात, सगळे मिळून कोल्हापूरची क्रीडा परंपरा आणखी उज्ज्वल करू या’असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक प्राप्त खेळाडूंचा गौरव केला. ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाजपटू स्प्नविल कुसाळे यांचा सत्कार त्यांच्या आई-वडिलांनी स्विकारला. खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, युवराज मालोजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा समारंभ झाला. कॉमर्स कॉलेज येथील सभागृहात हा कार्यक्रम झाला. राष्ट्रीय क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मोबाइलद्वारे कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळ पाटणकर यांनी, प्रास्ताविकात कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासाला वेग मिळावा खेळाडूंसाठी पायाभूत सुविधा, निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्राची सुविधा उपलब्ध करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. युवराज मालोजीराजे यांनी, ‘कोल्हापूरने प्रत्येक क्रीडा प्रकारात गुणवत्ता सिद्ध कली आहे. तेव्हा क्रीडा क्षेत्राला प्रशासन व सरकारकडून झुकते माप मिळावे. जिल्हा नियोजन समितीमधून तीन टक्के निधी क्रीडा वास्तूंच्या देखभाल-दुरुस्तीसाठी राखीव ठेवावा अशी सूचना केली. खासदार धनंजय महाडिक यांनी, सध्या सगळयाच खेळातील टेक्निक आणि टेक्नॉलॉजी बदलली आहे. हे बदलते तंत्र व तंत्रज्ञान खेळाडूनी आत्मसात करायला हवेत. केंद्र सरकार खेळाडूंना अधिकाधिक सुविधा देत आहे. उद्योग जगतानेही खेळाडूंना हातभार द्यावा. खासदार धैर्यशील माने यांनी, खेळामध्ये उत्तम करिअर घडते. यासाठी सामान्य माणसाला खेळाशी जोडावे लागेल. तसेच पालकांची मानसिकता बदलावी लागले. मोबाइलवरील मुले मैदानात दिसली पाहिजेत यासाठी संयुक्त प्रयत्न गरजेचे आहेत. आमदार चंद्रदीप नरके यांनी कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासंबंधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घ्यावी असा मुद्दा मांडला.
क्रीडा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिलीप मोहिते, आनंद माने, सतीश घाटगे, प्रा. अमर सासने यांच्या हस्ते उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, घाटगे ग्रुपचे मोहन घाटगे, जयसिंगराव कुसाळे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, हॉटेल मालक संघाचे सचिन शानबाग, भारतेश्वर चौगुले, राजन उरुणकर, प्रफुल्ल पाटील, दिग्विजय मालगे, संजय तोरस्कर, शिवतेज खराडे, शिवाजी पाटील, मोहन भांडवले इत्यादी उपस्थित होते.