कॉसमॉसचे अध्यक्ष मिलिंद काळेना यंदाचा डॉ. डी वाय पाटील जीवनगौरव पुरस्कार
schedule29 Aug 25 person by visibility 58 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून २०२५- २६ साठीचा "डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार" कॉसमॉस बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना जाहीर झाला आहे. सोमवार १ सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या २० व्या स्थापना दिनी आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिसेसचे महासंचालक लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात हा सन्मान प्रदान केला जाणार असल्याची माहिती कुलपती डॉ. संजय पाटील व कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी दिली. या समारंभाला डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांची उपस्थितीत राहणार आहे.
सोमवारी विद्यापीठाच्या २० व्या स्थापना दिनी सकाळी ९.३० वाजता विद्यापीठ प्रांगणात ध्वजवंदन व विद्यापीठ गीत होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता हॉटेल सयाजीच्या मेघ मल्हार सभागृहात पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. यावेळी जीवन गौरव पुरस्कारासह, आदर्श शिक्षक, आदर्श सेवक, गुणवंत विद्यार्थी असे विविध पुरस्कार प्रदान केले जाणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी दिली.
जीवन गौरव पुरस्काराने गौरविले जाणारे कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मिलींद काळे यांनी प्रतिकूल परिस्थितीत चार्टर्ड अकाउंटन्सी, कॉस्ट अकाउंटन्सी, बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, एमबीए फायनान्स आणि पत्रकारिता असे पाच व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. १९८३ साली त्यांनी स्वतःची चार्टर्ड अकाउंटन्सी प्रॅक्टिस सुरू केली. १९९९ पासून ते कॉसमॉस बँक संचालक तर २०१५ पासून बँकेचे अध्यक्ष होते. त्यांनी महिलांसाठी विशेष कर्ज योजना राबवून १५०० हून अधिक बचत गटांना आर्थिक सहाय्य केले.
आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिसेसचे महासंचालक लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयल हे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी आहेत. ३५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिसेसमध्ये विविध पदांवर काम केले. सध्या ते महासंचालक (कर्मचारी आणि संघटन) म्हणून कार्यरत असून यापूर्वी दिल्ली मुख्यालय येथे मेजर जनरल म्हणून काम केले. बागडोग्रामध्ये ६०० खाटांच्या तर पुण्यात ११०० खाटांच्या कमांड हॉस्पिटलचे त्यांनी नेतृत्व केले. त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल ‘अति विशिष्ट सेवा पदक’ आणि ‘विशिष्ट सेवा पदक’, ‘रक्षा मंत्री ट्रॉफी’ने त्यांना सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती डॉ. शर्मा व डॉ. भोसले यांनी दिली.