गोकुळतर्फे गाय- म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयांनी वाढ
schedule29 Aug 25 person by visibility 893 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे गाय व म्हैस दूर खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तसेच संस्था इमारत अनुदान, दूध संस्था कर्मचारी प्रोत्साहन वाढ, मुक्त गोठा योजनेत सुधारणा करण्यात आले आहे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी यासंदर्भातील माहिती दिली
1 सप्टेंबर 2025 पासून म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये प्रतिलिटर १ रुपये वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. जिल्ह्यातील म्हैस दूध खरेदी दरामध्ये ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर ५०.५० रूपयेवरुन ५१.५० रुपये करण्यात आला आहे. तसेच ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रूपये ५४.८० वरून रूपये ५५.८० करण्यात आला आहे. गाय दुधामध्ये ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता प्रतिलिटर गाय दूध खरेदी दर ३२.०० रूपये वरून ३३.०० रूपये करण्यात आला आहे. या दर वाढीमुळे गोकुळच्या म्हैस व गाय दूध उत्पादकांना महिन्याकाठी जवळ-जवळ साडे चार ते पाच कोटीचा जादाचा दर मिळणार आहे. सद्यस्थितीत गोकुळ दुधाच्या विक्री दरामध्ये कोणतीह वाढ करण्यात आलेली नाही.
संस्था इमारत अनुदानात दूध संस्थेच्या संकलनानुसार अनुदानात रक्कमेत ८ ते १० हजार रुपयाची वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. संस्था कर्मचारी हे दूध उत्पादक व संस्था यांच्यामध्ये दुवा असल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राथमिक दूध संस्थाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी प्रोत्साहनपर जादा दर प्रतिलिटर ५ पैशाची वाढ करण्यात येणार असून ती प्रतिलिटर ०.६५ पैसे ऐवजी ०.७० पैसे करण्यात आली आहे. याचा जवळ-जवळ ३ कोटी रुपये वार्षिक आर्थिक भार संघावरती पडणार आहे.गोकुळ दूध संघाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या मुक्त गोठा अनुदान योजनेत यापूर्वी किमान ५ जनावरांपर्यंत असणाऱ्या गोठ्यांनाच अनुदान दिले जात होते. ती अट शिथिल करून लहान दूध उत्पादकांनाही या योजनेचा लाभ मिळावा म्हणून किमान ५ ऐवजी ४ जनावरे असलेल्या मुक्त गोठ्याला अनुदान दिले जाणार आहे.
गोकुळ दूध संघाला जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील ७ हजार ५०० प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून जवळ-जवळ १६ लाख लिटर प्रतिदिन संकलन होते