गोकुळच्या संचालकांचा गोवा दौरा स्वखर्चाने, शौमिका महाडिक सभेला फलक घेऊन येणार नाहीत- मंत्री हसन मुश्रीफ
schedule22 Aug 25 person by visibility 631 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ गोकुळ दूध संघाचे संचालक मंडळ गोव्याला का गेले होते ? याचे कोडे मलाही उलगडले नव्हते. माहिती घेतली असता ते स्वतःच्या खर्चाने गेले होते असे आढळून आले. त्यामुळे तो मुद्दा मी आता काढत नाही. दरम्यान; गोव्यामध्येही गोकुळ दुधाची विक्री होते. अधिकची बाजारपेठ आणि मार्केटिंगसाठी त्या सरकारचेही सहकार्य मिळण्यासाठी संचालक मंडळ तिथले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही भेटले आहे. संचालिका शौमिका महाडिक या गेली चार वर्षे विरोध करीत होत्या. आता महायुतीचाच अध्यक्ष असल्यामुळे येणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या फलक घेऊन येणार नाहीत, घोषणा देणार नाहीत. सभा शांततेत होईल. तसेच; त्यांचे माहेर कागल आहे.’असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाशी संलग्न कागल तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा शुक्रवारी (२२ ऑगस्ट) आर.के.मंगल कार्यालक बामणी येथे झाली. गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री मुश्रीफ म्हणाले ,‘गोकुळ दूध संघाकडून दुधाळ म्हैशीसाठी या आधीच ५० हजार रुपये अनुदान सुरू आहे. दूध संघाने केडीसीसी बँकेबरोबर जर सर्व व्यवहार केले तर म्हैशीला बँकेकडून ज्यादा १० हजार रुपये अनुदान देऊ.’सभेत प्रविणसिंह पाटील (मुरगूड), बाबासाहेब तुरंबे (साके), टी.एम.पवार (व्हनाळी), मानसिंग पाटील (सांगाव), रविंद्र पाटील (बाणगे), बिद्री साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन मनोज फराकटे, जयदीप पोवार (बिद्री),डी.एम.चौगले (सोनाळी), आदि संस्था प्रतिनिधींनी प्रश्न विचारले. संचालक अंबरिषसिंह घाटगे प्रास्तावित केले.संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी आभार मानले. संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, रणजितसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले उपस्थित होते.
.................
लाडका सुपरवायझर स्पर्धा......!
मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, गोकुळ दूध संघाचे सुपरवायझर यांनी अजून दूध संकलन वाढीसाठी मेहनत करावी. व संघाने प्रत्येक कार्यक्षेत्रात स्पर्धा आयोजित करून जास्तीत जास्त दूध उत्पादकांना जातिवंत म्हैस खरेदीस प्रोत्साहित करावे, तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्यांना लाडका सुपरवायझर म्हणून प्रोत्साहन पर रोख १ लाख रुपयाचे बक्षिस संघामार्फत देणेत यावे.