परीक्षा उत्तीर्ण, कागदपत्रांची पडताळणी पूर्ण ! नियुक्तीसाठी मात्र तारीख ते तारीख !!
schedule04 Apr 25 person by visibility 114 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आरोग्य सेवकपदासाठी आवश्यक लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले, सर्वसाधारण गुणवत्ता यादी-कागदपत्रांची पडताळणी झाली. मात्र नियुक्ती पत्रे देण्याबाबत टाळाटाळ…संबंधित उमेदवारांना केवळ तारीख पे तारीख ! ही स्थिती आहे, कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील आरोग्य सेवक पदासाठी पात्र उमेदवारांची. जवळपास शंभरहून अधिक उमेदवार गेले आठ महिने नियुक्ती पत्रासाठी जिल्हा परिषदेत हेलपाटे मारत आहेत. कधी आरोग्य विभाग, कधी सामान्य प्रशासन विभाग तर कधी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दालन. प्रत्येक ठिकाणी नियुक्ती पत्रे देण्यावरुन चालढकल सुरू असल्याचा अनुभव संबंधितांना येत आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने आरोग्यसेवक ५० टक्के भरतीसंदर्भात चालढकल करू नये. येत्या आठ दिवसात सर्व उमेदवारांना नियुक्त्या मिळाल्या नाहीत तर जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा संबंधित उमेदवारांनी दिला आहे. सचिन गौड, सूरज कांबळे, अनिल वडर, श्रीधर कांबळे, रणजीत गुरव, प्रवीण गुरव, नदीम मोमीन, अमोल डवरे आदींनी उपोषण करण्याच इशारा दिला आहे. १०३ उमेदवार नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. लेखी परीक्षा, सर्वसाधारण गुणवत्ता यादी, कागदपत्र पडताळणी ही सगळी प्रक्रिया ऑगस्ट २०२४ मध्ये पूर्ण झाली आहे. अंतिम निवड यादी व समुपदेशन करुन नियुक्त्या देणे प्रलंबित आहे.
इतर जिल्हा परिषदांनी अंतिम निकाल जाहीर करुन नियुक्त्या दिल्या. मात्र कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून भरती प्रक्रियेस विलंबांचे धोरण लावले जात असल्याचे चित्र आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये जाहीरात प्रसिद्ध करुन या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली होती. पावणे दोन वर्षाचा कालावधी होत आला तरी अजून भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही याकडेही संबंधितांनी लक्ष वेधले.
दरम्यान जिल्हा परिषद आरोग्य विभागाने, महिनाभरात आरोग्यसेवकांच्या भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल. आरोग्य सेवक ५० टक्के भरतीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. कोर्टाने भरती करण्याबाबत आदेश दिले आहेत. माजी सैनिकांसाठी आरक्षित जागेसंबंधी निवड समितीची आठ एप्रिल २०२५ रोजी बैठक आहे. त्यानंतर आयुक्त कार्यालयाला यासंबंधीची माहिती सादर करुन मंजुरी घेतली जाईल. त्यानंतर नियुक्ती पत्रे देण्यात येतील’असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.