सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कारभारामुळे शिक्षक बँकेच्या ठेवी घटल्या ! कर्जे कमी झाल्या, बोगस नफा दाखवला !! -विरोधी आघाडीचा आरोप
schedule05 Sep 25 person by visibility 1000 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्राथमिक शिक्षकांची सर्वोच्च संस्था समजल्या जाणाऱ्या दि प्राथमिक शिक्षक बँकेत सत्ताधारी संचालक मंडळ मनमानी पद्धतीने कामकाज करत आहे. गेल्या वर्षभरात बँकेच्या ठेवी घटल्या, कर्ज मागणी कमी झाली आहे. तसेच यंदा बँकेचा जो नफा दाखविला आहे, तो चुकीचा आणि बोगस आहे असा आरोप विरोधी आघाडीने केला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक (माजी आमदार शिवाजीराव पाटील) गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत २०२४-२५ चा वार्षिक अहवालाचा आधार देत सत्ताधाऱ्यांच्या कामकाजाचे वाभाडे काढले. बँकेचे चेअरमन शिवाजीराव रोडे पाटील हे निवडणुकीपूर्वी अहमदनगर बँकेशी तुलना करत होते, आता कोल्हापूर प्राथमिक शिक्षक बँकेची जी अधोगती होत आहे ते आता कोणाशी तुलना करणार ? की नुसती पत्रकबाजी करत सभासदांची दिशाभूल करत फिरणार ?’ असा टोलाही पदाधिकाऱ्यांनी लगाविला.
शिक्षक संघाचे राज्य सल्लागार राजाराम वरुटे म्हणाले, ‘ सत्ताधारी संचालक मंडळाचा कारभार हा सभासदाभिमुख नाही. सभासदांना भेडसावणाऱ्या प्रश्नासंदर्भात शिक्षक संघाने विचारणा केली आहे. त्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे सत्ताधाऱ्यांनी समाधानकारक द्यावी. सभा शांततेत पार पाडण्यासाठी आम्ही सहकार्य करू. सभा शांततेत पार पाडण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे. शिवाय सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कारभाराविरोधात सहकार विभाग व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे दाद मागू. दोन-दोन वेळेला व्याज आकारणी प्रकार हा सभासदांची आर्थिक लूट करणारा प्रकार आहे.’
बँकेचे माजी अध्यक्ष संभाज बापट म्हणाले, ‘सत्ताधारी संचालक मंडळाने कोणत्याही स्वरुपाच्या तरतुदी केल्या नाहीत. गुंतवणूक तूट निधी (५० लाख तरतूद नाही), घसारा फंड (१५ लाख तरतूद नाही), मुदत संपलेल्या ठेवीवर व्याज (सात लाख व देणे व्याज दोन कोटी ६७ लाख तरतूद नाही) निवडणूक खर्च (आठ लाख तरतूद नाही), कर्मचारी ग्रॅज्युएटी (७० लाख व रजा पगार ३५ लाख तरतूद केली नाही) यासह अन्य कारणासाठी मिळून चार कोटीपेक्षा जास्त तरतुदी केल्या नाहीत. या तरतुदी वजा जाता बँक एक कोटीपेक्षा जास्त रकमेने तोटयात दिसते. बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव कांबळे म्हणाले, ’सभासदांच्या हिताचा कारभार करण्यात सत्ताधारी नापास ठरले आहेत. मोठी आकडेवारी सांगत सभासदांची दिशाभूस सुरू आहे. बडा घर पोकळ वसा-सभासदांनी फक्त कर्ज भरत बसा असा त्यांचा कारभार आहे.’ महिला आघाडीच्या श्वेता खांडेकर यांनी अमृत संजीवनी योजनेवरुन प्रश्न उपस्थित केला.
निलंबित कर्मचाऱ्याला नोकरीवर, आठ शिपायांची भरती
संचालक राजेंद्र पाटील वह बाळकृष्ण हळदकर हे निवृत्त झाले आहेत, तरी संचालकपदावर कसे ? शिवाय निलंबित कर्मचाऱ्याला सत्ताधाऱ्यांनी पुन्हा कामावर घेतले. ४२ हजार रुपये वेतन दिले. सतरा लाख कर्ज वाटप केले हे कोणत्या प्रकारचे कामकाज ? असा सवाल शिक्षक संघाने उपस्थित केला. बँकेचे माजी अध्यक्ष राजमोहन पाटील म्हणाले, ‘ सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी, आमच्या कालावधीतील कामगिरीवर सभासदांची दिशाभूल केली. नोकरभरतीवरुन खोटेनाटे आरोप केले. मात्र आता याच मंडळींनी बँकेत नोकरभरती केली. आठ कर्मचाऱ्यांना रोजंदारीवर घेतले आहे. वार्षिक सभेनंतर त्यांना कायम करतील. पूर्वीच्या आठ शिपायांना पदोन्नती देऊन त्या जागा खाली दाखवतील. दोन वर्षात पदोन्नती देणारी ही कसली संस्था ?” प्रशांत पोतदार म्हणाले, ‘चालू आर्थिक वर्षात ७० लाख अॅडव्हान्स दिसून येतो. अहवाल वर्षामध्ये एकूण सात कोटी ५० लाख रुपये इतकी कर्जे कमी झाली आहेत. तसेच एक कोटी ५९ लाख ८० हजार ठेवी कमी झालेलया दिसून येतात. थकबाकीचे प्रमाण वाढलेले आहे.डेटा सेंटरवर वारेमाफ खर्च केला आहे. बी. एस. पाटील म्हणाले, एटीएम कार्ड बंद असताना सभासदांच्या खात्यावर ११८ रुपये खर्च टाकला जात आहे.‘ जिल्हाध्यक्ष बबन केकरे म्हणाले,“सत्ताधारी संचालक मंडळाच्या मनमानी कारभाराचा फटका सभासदांना बसत आहे. एकाच महिन्यात दोन वेळेला व्याज आकारणी हा सभासदांवर अन्याय आहे.‘
पत्रकार परिषदेला बँकेचे माजी अध्यक्ष साहेबराव शिक्षक, शिक्षक संघाचे सरचिटणीस डी. पी. पाटील, सर्जेराव सुतार, शशीकुमार पाटील, दिलीप पाटील, बजरंग लगारे, आनंदराव सुतार, प्रकाश पाटील, संजय पाटील, बबलू वडर, जयसिंग पाटील, श्रीकांत चव्हाण आदी उपस्थित होते.