मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेचे दागिने लुटले, पाचगाव-गिरगाव रोडवरील प्रकार
schedule05 Sep 25 person by visibility 175 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर तालुक्यातील पाचगाव –गिरगाव रोडवर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलांना शुक्रवारी (पाच सप्टेंबर २०२५) जीवघेणा अनुभव आला. सकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास मोटारसायकवरुन आलेल्या तिघा चोरटयांनी, दोन महिलांना चाकूचा धाक दाखवला. एका महिलेचे दागिने लंपास केले. अचानक घडलेल्या या घटनेने महिला घाबरल्या. त्यांनी आरडाओरड केला. सकाळी फिरायला गेलेले लोक मदतीसाठी येत असल्याचे पाहून तिघे चोरटे पसार झाले.
सुनीता नारायण माने (रा. ओम साई कॉलनी) व मंगल रंगराव पाटील (रा. डी. डी. शिंदे सरकार गोडाऊन शेजारी) या दोघी शुक्रवारी सकाळी फिरायला गेल्या होत्या. पाचगाव –गिरगाव रोडवर फिरत असताना मोटारसायकलवरुन तीन युवक त्यांच्या मागोमाग येत होते. गिरगाव डोंगर येथील मार्ग घाटात वर्दळ कमी होती. रस्त्यावर कोणी नसल्याचे पाहून मोटारसायकलस्वारांनी त्या महिलांना अडविले. चाकूचा धाक दाखवला. दागिने देण्याविषयी दटावले. महिलांनी विरोध केल्यावर जबरदस्तीने सुनिता माने यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावले. तसेच मंगल पाटील यांच्या हातातील पाटल्या काढण्याचा प्रयत्न केला.
अचानक घडलेल्या या प्रकाराने महिला घाबरल्या. त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. दरम्यान सकाळी फिरावयास आलेले नागरिक मदतीसाठी धावले. ते पाहून चोरटे मोटरसायकलवर बसून पाचगावच्या दिशेने पसार झाले. दरम्यान महिलांना चाकूचा धाक दाखवून दागिने लुटण्याचा प्रकार घडल्याचे समजताच करवीरचे पोलिस उपअधिक्षक सुजितकुमार क्षिरसागर, करवीर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. डीबी पथकाकडून सीसीटीव्हीचा आधार घेत चोरटयांचा शोध सुरू केला आहे.