मॅनेजमेंट कौन्सिलवर डॉ. मंजिरी मोरेंची बिनविरोध निवड ! पुरुष गटात हंगेरगीकर, निमट यांच्यामध्ये लढत !!
schedule04 Apr 25 person by visibility 618 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन व विद्या परिषदेच्या सदस्या प्रा. डॉ. मंजिरी देसाई-मोरे यांची बिनविरोध निवड झाली. विद्या परिषदेच्या सदस्या व विद्यापीठातील जर्नालिझम विभागातील प्रा. डॉ. निशा मुडे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला. यामुळे मोरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. येत्या ११ एप्रिल रोजी अॅकेडमिक कौन्सिलची बैठक होत आहे. त्या बैठकीत अधिकृत घोषणा होईल. विद्यापीठाच्या सभा व निवडणूक विभागातर्फे निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुलसचिव व्ही. एन. शिंदे हे काम पाहत आहेत.
दरम्यान पुरुष गटातून निवडण्यात येणाऱ्या एका जागेसाठी निवडणूक लागली आहे. शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी व शिवाजी विद्यापीठ शिक्षक (सुटा) संघ यांच्यामध्ये लढत आहे. विकास आघाडीकडून विद्या परिषदेचे सदस्य व रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. एस. पी. हंगेरगीकर व सुटाकडन प्रा. आर. के. निमट (पाटण महाविद्यालय) यांच्यामध्ये लढत आहे. मॅनेजमेंट कौन्सिलच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन जागा अॅकेडमिक कौन्सिलच्या सदस्यातून निवडण्यात येणार आहेत. या दोन जागेसाठी महिला गटातून प्रा. डॉ. मंजिरी मोरे व प्रा. डॉ. निशा मुडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
पुरुष गटातील एका जागेसाठी विद्यापीठ विकास आघाडीकडून प्रा. हंगेरगीकर, भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेजचे प्रा. डॉ. मनिष भाटिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सुटाकडून प्रा. निमट व प्रा. डॉ. सुनील चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. अर्ज छाननी प्रक्रियेत प्रा. भाटिया यांचा अर्ज अवैध ठरला. तर उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी सुटाच्या प्रा. चव्हाण यांनी उमेदवारी मागे घेतली. यामुळे पुरुष गटातील एका जागेसाठी विकास आघाडीचे प्रा. हंगेरगीकर व सुटाचे. प्रा. निमट यांच्यामध्ये लढत होणार आहे.
महिला गटातील एका जागेसाठी डॉ. मंजिरी मोरे व डॉ. निशा मुडे या दोघींचे अर्ज होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारी (४ एप्रिल २०२५) पाच वाजेपर्यंत होती. दरम्यान शुक्रवारी दुपारच्या सुमारास प्रा. मुडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे मोरे यांची निवड बिनविरोध झाली. मोरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे समजताच गोखले कॉलेज येथे प्राध्यापकांनी, डॉ. मोरे यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली. गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.