गडहिंग्लज तालुक्यातून होणाऱ्या दूध पुरवठयात म्हैस दूध ५४ टक्के हे अभिमानास्पद-मंत्री हसन मुश्रीफ
schedule23 Aug 25 person by visibility 87 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘गडहिंग्लज तालुक्यातून गोकुळला होणाऱ्या दूध पुरवठ्यामध्ये म्हैशीचे दूध ५४ टक्के तर गाईचे दूध ४६ टक्के आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. गोकुळची प्रगती ही दूध उत्पादकांच्या सहकार्यानेच झाली असून गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या चार वर्षांत म्हैशीच्या दुधाला १२ रुपये व गाईच्या दुधाला ६ रुपये अशी महत्त्वपूर्ण दरवाढ करण्यात आली आहे. बाजारपेठेत गोकुळच्या म्हैशीच्या दुधाला मोठी मागणी असून, यामुळे संघाची खरी ओळख ही म्हैशीच्या दुधामुळेच आहे.”असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाशी संलग्न गडहिंग्लज तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा शनिवारी सूर्या मंगल कार्यालय, गडहिंग्लज येथे झाली. याप्रसंगी मंत्री मुश्रीफ बोलत होते. गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. गोकुळचे चेअरमन मुश्रीफ यांनी, गडहिंग्लज तालुक्यामध्ये दुग्ध व्यवसायमध्ये युवकांचे प्रमाण समाधानकारक असून अजून अधिकाधिक तरुणांनी या दुग्ध व्यवसायाकडे गोकुळच्या सेवा सुविधांचा लाभ घेऊन या क्षेत्रात सहभागी व्हावे असे आवाहन केले.संचालिका श्रीमती अंजना रेडेकर यांनी प्रास्ताविक केले. संचालक रणजितसिंह पाटील यांनी आभार मानले. संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, रणजितसिंह पाटील, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले उपस्थित होते.