गोकुळच्या राजकारणात ट्विस्ट ! अरुण डोंगळे रजेवर, अध्यक्षपदाचा राजीनामा नाहीच !
schedule15 May 25 person by visibility 195 categoryराजकीय
हाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदाचा राजीनामा देणार नाही असा पवित्रा घेतलेल्या चेअरमन अरुण डोंगळे यांनी गुरुवारी (१५ मे २०२५) संघाच्या बोर्ड मिटिंगकडे पाठ फिरवली. वैयक्तिक कारणास्तव रजेवर जात असल्याचे पत्र पाठवत त्यांनी गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांना धक्का दिला. डोंगळे हे बोर्ड मिटिंगला नसल्यामुळे राजीनाम्याचा विषयही उपस्थित झाला नाही. त्यांच्या गैरहजेरीत, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांची बोर्ड मिटिंगसाठी तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करुन बैठक पार पडली. या बैठकीला गोकुळ दूध संघाचे सत्ताधारी व विरोधी आघाडीचे संचालक उपस्थित होते.
दरम्यान ‘गोकुळच्या संचालकांची ही बैठक नियमित होती. दूध संघाशी निगडीत विषय होते. या बैठकीत चेअरमन डोंगळे यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा व त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यासंबंधी कोणतीही चर्चा झाली नाही. डोंगळे यांच्यासंबंधी सत्ताधारी आघाडीचे नेते जो आदेश देतील त्या नुसार आम्ही काम करू. ’असे स्पष्टीकरण ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. चार वर्षापूर्वी झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील, मंत्री मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील आदींनी एकत्र येत सत्ता परिवर्तन केले. सत्ता बदलानंतर पहिले दोन वर्षे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, त्यानंतर दोन वर्षे डोंगळे यांना चेअरमनपद मिळाले. येत्या २५ मे रोजी डोंगळे यांच्या चेअरमनपदाचा कालावधी संपला आहे. गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते पाटील व मुश्रीफ यांनी डोंगळे यांना पंधरा मे रोजी होणाऱ्या बोर्ड मिटिंगमध्ये चेअरमन अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्याविषयी सूचना केली होती.
त्यानुसार गुरुवारी, बोर्ड मिटिंग आयोजित केली होती. या बैठकीत डोंगळे यांचा राजीनामा होणार हे गृहित धरुन नवा अध्यक्ष निवडीच्या हालचाली सुरू होत्या. दरम्यान डोंगळे यांनी बुधवारी, चौदा मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुंबई दौऱ्यात डोंगळे यांना राजीनामा न देण्याविषयीच्या सूचना मिळाल्या. डोंगळे यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना चेअरमनपदाचा राजीनामा देणार नाही असे सपष्टपणे सांगितले. गुरुवारी सकाळी ते मुंबईहून कोल्हापूरला आले. विमानतळ येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राजीनामा न देण्याविषयी पुनरूच्चार केला. आणि त्यांनी आपण वैयक्तिक कारणास्तव रजेवर जात असल्याचे सांगितले. दुपारी बारा वाजता त्यांनी, यासंबंधीची माहिती गोकुळच्या प्रशासनाला दिली.
दुसरीकडे गोकुळच्या संचालकांची बोर्ड मिटिंग दुपारी एक वाजता गोकुळ शिरगाव येथील गोकुळ प्रकल्प कार्यालयात झाली. या बैठकीला डोंगळे अनुपस्थित होते. त्यांच्या रजेच्या अर्जाचे वाचन गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी पार्टी मिटिंगमध्ये केले. त्यानंतर बैठकीसाठी तात्पुरता अध्यक्ष निवडण्याचे ठरले. ज्येष्ठ संचालक म्हणून विश्वास पाटील यांना बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान दिला. त्यांच्या उपस्थितीमध्ये संचालकांची बैठक झाली. या बैठकीला सत्ताधारी आघाडीचे सगळे संचालक होते. तसेच विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक, संचालक अंबरिश घाटगे, बाळासाहेब खाडे, चेतन नरके हे देखील उपस्थित होते.