सेवानिवृत्तीनिमित्त डॉ. सुनील काटकर यांचा सपत्नीक सत्कार
schedule30 May 23 person by visibility 270 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
पशुसंवर्धन विभागातील ३९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ. सुनील बाबुराव काटकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे सत्काराचे स्वरुप होते. या समारंभात त्यांना मोटार प्रदान करण्यात आली. गौरव समिती व पशुचिकित्सा व्यावसायिक संघटना शाखा कोल्हापूर यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील हे प्रमुख पाहुणे होते.
या समारंभात विविध मान्यवरांनी डॉ. काटकर यांच्या नोकरीच्या कालावधीतील कामकाजाचे कौतुक केले. या कार्यक्रमास मधुरिमाराजे छत्रपती, आमदार जयश्री जाधव, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर, सुनील मोदी, डॉ. महेश बनसोडे यांनी भाषणात काटकर यांचे सेवाकालातील कामगिरीबद्दल कौतुक केले. काटकर हे मूळचे करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील. १३ जुलै १९८४ मध्ये ते पशुधन पर्यवेक्षक म्हणून नोकरीत रुजू झाले. शाहूवाडी तालुक्यातील करंजफेण येथे नोकरीला सुरुवात झाली. प्रयाग चिखली, वडणगे येथे नोकरी करत असताना नवीन पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात पुढाकार घेतला.
वाशी येथे काम करत असताना ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत ५० हजार रुपयांचे बक्षीस पशुवैद्यकीय दवाखान्याला मिळवून दिले. पंचायत समिती हातकणंगले येथे काही महिने काम केले. राधानगरी येथून सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणून ३० एप्रिल २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांना जिल्हा परिषदेचा राजर्षी शाहू उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय विविध संघटनांनी त्यांना पुरस्कारांनी गौरविले आहे. पशुचिकित्सा व्यवसाय कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष म्हणून तेरा वर्षे जबाबदारी पार पाडली. संघटनेच्या माध्यमातून काम करताना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला चालना दिली.
जिल्हा मध्वर्ती बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर, माजी महापौर सागर चव्हाण, राजेंद्र डकरे, दिलीप शेटे, किरण शिराळे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, अतुल जाधव, प्रशांत कदम, गौरव समिती सदस्य, विविध संघटना व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. बी.आर. बाळाण्णा यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रमाोद खोपडे यांनी आभार मानले.