पाणीपट्टी दर कमी करावेत ! राजेश क्षीरसागरांची महापालिका प्रशासनास सूचना
schedule16 Nov 23 person by visibility 338 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरास काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा करण्याची योजना पूर्ण झाली आहे. या योजनेतून शहरवासियांना पाणी पुरवठा करण्यास सुरवात झाली आहे. ही योजना सुरु झाल्याने महानगरपालिकेचा होणारा खर्चही बऱ्याच अंशी कमी झाला आहे. या योजनेतून नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करण्यासोबतच पाणीपट्टी दर कमी व्हावा अशी नागरिकांची मागणी असून, पाणीपट्टी दर कमी करण्याबाबत उपाययोजना कराव्यात, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका प्रशासनास दिल्या.
महानगरपालिका आखत्यारीत विविध विषयांवर आज शासकीय विश्रामगृह येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी आयुक्त श्रीमती के.मंजूलक्ष्मी यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.
बैठकीच्या सुरवातीस महानगरपालिका प्रशासनामार्फत सुरु असलेल्या विविध विकासकामांचा क्षीरसागर यांनी आढावा घेतला.‘ निधी मंजूर होवूनही कामे वेळेत सुरु होत नाहीत. याचा परिणाम कामे रखडली जातात. गांधी मैदान ड्रेनेज काम, नगरोत्थान निधी अशी प्रमुख कामे निधी असूनही सुरु झालेली नाहीत. मंजूर झालेली कामे सुरु करू करण्यास काय वावडे आहे ? जनतेचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी प्रशासन आणि अधिकारी कटिबद्ध असताना जनतेच्या गरजेच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात असल्यास त्याची गय केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यासह शहर विकासाच्या दृष्टीने पादचारी उड्डाणपूल, पार्किंग व्यवस्था आदी मुद्दे बैठकीपुरतेच चर्चेला येता. यावर पुढे कोणतीही कार्यवाही होत नाही. १०० फुटी रोड, रंकाळ्या नजीकचा नियोजित रिंग रोड ही कामे रखडली गेली आहेत. यामुळे कोल्हापूर शहर इतर शहरांच्या तुलनेत खूप मागे पडले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी गांभीर्याने या कामांच्या पुर्णत्वासाठी काटेकोरपणे काम करावे. आवश्यक कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, उप आयुक्त शिल्पा दरेकर, शहरअभियंता हर्षजीत घाटगे, जलअभियंता नेत्रदिप सरनोबत, नगररचना विभागाचे फुलारे आदी अधिकारी उपस्थित होते.