शाहूवाडीत दोन ग्रामविकास अधिकारी लाच घेताना पकडले
schedule12 Dec 24 person by visibility 84 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शाहूवाडी तालुक्यात केलेल्या कारवाईत दोन ग्रामविकास अधिकारी लाच घेताना पकडले. बांबवडे गावचे ग्रामविकास अधिकारी सचिन मोरे व साळशी पिशवी येथील ग्रामविकास अधिकारी प्रथमेश डंबे यांच्यावर पाच हजार रुपयाची लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई झाली आहे. मोरे आणि डंबे दोघेही जुने पारगाव येथील आहेत.
यातील तक्रारदारांचे सासरे हे बांबवडे गावचे रहिवासी होते. सासऱ्याचा मृत्यूचा दाखला व राहत्या घराचा घरटाण उतारा मिळावा म्ह्णून ग्रामविकास अधिकारी मोरे यांच्याकडे मागणी केली होती. मात्र दाखला देण्यासाठी मोरे यांनी टाळाटाळ केली. महिनाभर पाठपुरावा करुनही दाखला मिळाला नाही. तक्रारदारांनी, मोरे यांची भेट घेतल्यावर वीस हजार रुपयांची मागणी केली. त्यामध्ये तडजोड होऊन पाच हजार रुपये देण्याचे ठरले.
तक्रारदाराने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविले. त्यानुसार बुधवारी सापळा रचला. पंचायत समिती शाहूवाडीसमोर ग्रामविकास अधिकारी मोरे व साथीदार साळशी-पिशवीचा साथीदार प्रथमेश डंबे पोहोचले. मोरे यांनी लाच म्हणून मागितलेले पैसे डंबे यांनी स्वीकारले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले.