गोकुळ निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी लढत ! नविद मुश्रीफ विरुद्ध शशिकांत खोत!!
schedule10 Oct 26 person by visibility 50 categoryउद्योग
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन -: गोकुळ दूध संघाच्या २५ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात…महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत. महायुतीच्या आघाडीचे नेतृत्व मंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ तर समविचारी आघाडीचे नेतृत्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्याकडे. दोन्ही आघाडयांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनविली आहे. प्रत्येक जागा महत्वाची…तरीही या निवडणुकीत सर्वाधिक लक्षवेधी लढत गोकुळचे माजी चेअरमन नविद मुश्रीफ व शशिकांत खोत यांच्यातील. इतर मागासवर्गीय गटातून ते एकमेकांसमोर उभे आहेत.
नविद हे मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव. गोकुळचे माजी चेअरमन. गोकुळमध्ये पहिल्यांदाच संचालक म्हणून प्रतिनिधीत्व करताना गेले वर्षभर ते चेअरमन होते. तर खोत हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, माजी उपाध्यक्ष. आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक. निवडणूक कोणतीही असो, आमदार पाटील यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ते कार्यरत असतात. आमदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची वाटचाल सुरू आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते म्हणून त्यांची ‘सतेज टीम’मध्ये ओळख. गोकुळ मल्टिस्टेटच्या विरोधातील लढयातही ते आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय होते. आमदार पाटील यांनी त्यांना, यंदा गोकुळसाठी ‘इतर मागासवर्गीय तथा ओबीसी गट’मधून राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीमधून उमेदवारी दिली आहे. खोत हे गोकुळ शिरगाव कणेरी येथील. स्थानिक स्वराज्य संस्थेतील कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.
‘ओबीसी’गटात माजी चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या विरोधातील उमेदवार म्हणून या गटातील लढत लक्षवेधी ठरत आहे. गोकुळचे चेअमरन म्हणून काम करण्याचा नविद यांचा पहिलाच अनुभव. त्यांच्याकडे साधारणपणे चेअरमनपदी काम करण्याचा वर्षभराचा कालावधी मिळाला. गोकुळच्या निवडणुकीमुळे त्यांच्या चेअरमनपदाच्या कालावधीकडे साऱ्यांच्याच नजरा लागल्या होत्या. दूध उत्पादकांशी निगडीत विषयात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केले. मंत्री मुश्रीफ यांचे चिरंजीव म्हणून कामकाज करताना, निर्णय घेताना सुलभ झाल्या. मात्र त्या पलीकडे जाऊन त्यांनी नेतृत्वगुण दाखविले. साऱ्यांना सोबत घेऊन कामकाज केले. साऱ्यांशी संवाद साधण्यावर भर दिला. संचालक म्हणून चार वर्षाच्या कालावधीपेक्षा चेअरमन म्हणून त्यांची वर्षभराची कारकीर्द उठावदार झाली.
गोकुळ निवडणुकीत दोन्ही आघाडयातील लढतीबरोबरच ओबीसी गटातील लढत पॉवरफुल्ल ठरलीय. मंत्री मुश्रीफ यांचे चिरंजीव य गटातून प्रतिनिधीत्व करत असल्यामुळे आपसूकच सर्वाधिक नजरा या गटातील लढतीकडे आहेत.