राजेश क्षीरसागरांच्यामुळे बावडयातील रियाला जीवदान, मुंबईत शस्त्रक्रिया यशस्वी
schedule12 Sep 23 person by visibility 574 categoryआरोग्य

मुंबईतील नारायणा हॉस्पिटलमध्ये दुर्धर आजारावर मोफत शस्त्रक्रिया
महाराष्ट्र न्यूज वन : कसबा बावड्यातील गाडीवर सरबत विकणारे धर्मेंद्र कोरे यांचे हातावरचे पोट. सरबत गाडीतून संसाराचा गाडा चालविणारे धर्मेंद्र कोरे यांची ८ वर्षाची चिमुकली मुलगी रिया हिला मूत्राशयाचा विकार जडला होता. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्याने उपचार करायचा तरी कुठे आणि कसा या द्विधा मनस्थितीत आलेल्या कोरे यांच्या कुटुंबियांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मदतीचा हात दिला. क्षीरसागर यांच्यामुळे रिया या ८ वर्षाच्या चिमुकलीवर मुंबईतील एसआरसीसी नारायणा हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
कसबा बावडा येथील सरबत फेरीवाले कोरे यांची चिमुकली रिया हि मूत्राशयाच्या विकाराने ग्रस्त होती. तिला एक- एक तासांनी बाथरूमला जावे लागत होते. त्यामुळे तिच्या मूत्राशयाची पुनर्रचना व पुनर्रोपण शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च येणार होता. त्यातच कोल्हापुरातील डॉक्टरांनी मुंबई येथे जाण्याचा सल्ला दिला. घरची हालाखीची परीस्थिती, मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी लाखोंचा खर्च आणि तोही मुंबईसारख्या शहरात.. पुढे कसे होणार? कर्ज काढून दवाखाना करावा लागणार? मुंबईत रहायचे कुठे? अशा द्विधा मनस्थितीत सापडलेल्य कोरे यांना क्षीरसागर यांच्या माध्यमातून होणाऱ्या वैद्यकीय कामांची माहिती मिळाली.
शिवसेनेचे वैद्यकीय सहाय्यता मदत कक्षाचे समन्वयक कृष्णा लोंढे यांच्या माध्यमातून त्यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांची भेट घेतली. यावर क्षणाचाही विलंब न लावता क्षीरसागर यांनी मुंबई येथील एस नारायणा हॉस्पिटल येथील डॉ.सरिता भागवत यांच्याशी संपर्क साधून तात्काळ आवश्यक शस्त्रक्रिया व उपचार न्यास निधीतून मोफत करण्याच्या सूचना दिल्या. गेल्या आठवड्यात कु.रिया हिला मुंबई येथील हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आणि तिच्यावर आवश्यक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या मोफत पार पडली. दरम्यान राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी मुंबईतील नारायणा हॉस्पिटल येथे भेट देवून रियाची आपुलकीने विचारपूस केली. राजेश क्षीरसागर यांच्या मदतीने रियाला जीवदान दिल्याचे सांगत धर्मेश कोरे भावूक झाले. यावेळी युवा नेते पुष्कराज क्षीरसागर, शिवसेना वैद्यकीय सहाय्यता मदत कक्षाचे कोल्हापूर समन्वयक कृष्णा लोंढे उपस्थित होते.