शिक्षणाधिकाऱ्यांची अचानक व्हिजीट, कनिष्ठ सहायकाला नोटीस
schedule08 Oct 25 person by visibility 577 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वार : बुधवार (८ ऑक्टोबर २०२५), वेळ : दुपार तीन-सव्वा तीनची. स्थळ : माध्यमिक शिक्षण विभाग. कार्यालयातील काही कर्मचारी कामात व्यस्त. तर काही जण टेबल सोडून अन्यत्र फिरणारे. तर कोण कार्यालयीन वेळेत कार्यालयाबाहेर. इतक्यात शाहूवाडी तालुक्याचा दौरा आटोपून माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत या शिक्षण विभागात दाखल झाल्या. जिल्हा परिषद मुख्यालयातील माध्यमिक शिक्षण विभागातील कार्यालयांची तपासणी सुरू केली. यावेळी कनिष्ठ सहायक विशाल पाटील हे कार्यालयीन वेळेत कार्यालयाबाहेर असल्याचे निदर्शनास आले. यावरुन शिक्षणाधिकारी सावंत यांनी त्यांना शिस्तभंगविषयक कारवाई का करू नये ? अशी नोटीस काढली आहे. या तपासणी दरम्यान शिक्षणाधिकारी सावंत यांनी अन्य कर्मचाऱ्यांना कार्यालयीन शिस्त, फायलींचा निपटारा यासंबंधी सक्त सूचना केल्या कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही तसेच कार्यालयीन वेळेत कोणी कार्यालयीन कामाव्यतिरिक्त विनाकारण बाहेर पडू नये. वारंवार सूचना करुनही शिस्त पालन होत नसेल तर कारवाई केली जाईल असे बजावले. शिक्षणाधिकारी सावंत यांनी सायंकाळी पुन्हा एकदा सगळया अधिकारी व कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन कामकाजासंबंधी सूचना केल्या.