क्रीडाई कोल्हापूरतर्फे तीस जानेवारीपासून चार दिवसीय दालन प्रदर्शन ! वास्तू विषयक १७० स्टॉल्सचा समावेश ! !
schedule22 Jan 26 person by visibility 45 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांची प्रमुख संघटना असलेल्या क्रीडाई कोल्हापूरतर्फे ३० जानेवारी ते दोन फेब्रुवारी २०२६ या कालावधीत वास्तू विषयक दालन प्रदर्शन आयोजित केले आहे. अशी माहिती क्रीडाईचे अध्यक्ष के. पी. खोत व दालन २०२६ चे चेअरमन महेश यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली. महासैनिक दरबार हॉल येथे सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन खुले असणार आहे.
मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे या पत्रकार परिषदेवेळी उपस्थित होत्या. त्या, प्रदर्शन कालावधीत एक फेब्रुवारी रोजी प्रदर्शनाला भेट देणार आहेत. नागरिकांशी संवाद साधणार आहेत. प्रदर्शनातील स्टॉलला भेटी देणार आहेत. दालन प्रदर्शनामुळे नागरिकांना हक्काची घरे उपब्लध होत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान या प्रदर्शनाविषयी बोलताना क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष खोत म्हणाले, ‘प्रदर्शनाचे यंदा तेरावे वर्ष आहे. दालन २०२६ चे उद्घाटन तीस जानेवारी रोजी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उपस्थिती असणार आहे. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता प्रो. एम. जी. गाडगीळ यांचे व्याख्यान आहे. एक फेब्रुवारी रोजी केमिकल इंजिनीअर अच्युत गोडबोले यांचे ‘एआय अँड चेजिंग वर्ल्ड’ याविषयी व्याख्यान आहे.
दालन २०२६ चे चेअरमन महेश यादव म्हणाले, ‘यंदाच्या प्रदर्शनात १७० हून स्टॉल् आहेत. दालन प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना विविध गृहप्रकल्प, व्यापारी संकुले, ऑफिसेस यासंबंधीची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. नवनवीन प्रकल्पासह बांधकाम विषयक तंत्रज्ञान, बांधकाम साहित्य, अर्थसहाय करणाऱ्या बँका या संबंधीची माहिती प्रदर्शनात असणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी.’ पत्रकार परिषेदला क्रीडाईचे उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, चेतन वसा, अमोल देशपांडे, आदित्य बेडेकर, संग्राम दळवी, निखिल शहा, सुनील चिले आदी उपस्थित होते.