भाजपकडून शिराळे, खाडे, देसाई, कुंभारांची नावे चर्चेत ! शिवसेनेचाही महापौरपदावर दावा !!
schedule22 Jan 26 person by visibility 879 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूरचे महापौरपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाले. मुंबईत निघालेल्या सोडतीमध्ये आरक्षण जाहीर झाले. ओबीसी प्रवर्गासाठी महापौरपद राखीव झाल्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून निवडून आलेले नगरसेवक विशाल शिराळे, प्रमोद देसाई, विजय देसाई, वैभव कुंभार यांची नावे चर्चेत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर दोन वेळा निवडून आलेले विजय खाडे यांचे नावही महापौर पदासाठी आघाडीवर येऊ शकते. त्यांच्याकडे ओबीसीचा दाखला आहे. राजारामपुरी येथून सातत्याने निवडून येणारे मुरलीधर जाधव यांच्याकडेही ओबीसीचा दाखला आहे मात्र त्यांनी सर्वसाधारण गटातून निवडणूक जिंकली आहे. दुसऱ्यांदा निवडून आलेल्या रुपाराणी निकम यांच्याकडेही ओबीसीचा दाखला आहे त्याही महापौर पदाच्या उमेदवार होऊ शकतात. मात्र सर्वसाधारण गटातून निवडून आलेल्या उमेदवाराकडे जर ओबीसीचा दाखला असेल आणि तो उमेदवार महापौर पद निवडणुकीस पात्र ठरला तर विजय खाडे आणि मुरलीधर जाधव हे दोघेही प्रबळ दावेदार होऊ शकतात. शिवसेनेच्या वाटयाला महापौरपद गेले तर या पक्षाकडे नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून निवडून आलेले अजय इंगवले, आश्किन आजरेकर हे नगरसेवक आहेत.
कोल्हापूर महापालिकेत महायुतीकडे ४५ नगरसेवकांचे बहुमत आहे. भाजपला २६, शिवसेनेला पंधरा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपच्या चिन्हावर नागरिकांचा मागास प्रवर्ग या गटातून प्रभाग तीनमध्ये प्रमोद देसाई निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक सातमध्ये भाजपच्या चिन्हावर विशाल किरण शिराळे हे निवडून आले आहेत. माजी नगरसेवक किरण शिराळे यांचे ते चिरंजीव आहेत. तसेच प्रभाग क्रमांक नऊमध्ये भाजपच्या चिन्हावर विजय वसंतराव देसाई हे निवडून आले आहेत. हे सगळे नवीन चेहरे आहेत. प्रभाग क्रमांक वीसमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून भाजपचे वैभव अविनाश कुंभार निवडून आले आहेत. भाजपकडून प्रभाग क्रमांक तेरामध्ये नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला गटातून रेखा रामचंद्र उगवे, प्रभाग क्रमांक वीसमध्ये भाजपच्या चिन्हावर ओबीसी महिला प्रवर्गातून सुरेखा सुनील ओटवकर या निवडून आल्या आहेत.
जर शिवसेनेकडे महापौरपद गेले तर प्रभाग क्रमांक दहामधील अजय इंगवले, प्रभाग क्रमांक बारामधील आश्किन गणी आजरेकर यांची नावे आघाडीवर असतील प्रभाग क्रमांक दोनमध्ये निवडून आलेल्या ओबीसी महिला प्रवर्गातील नगरसेविका अर्चना उत्तम पागर, प्रभाग क्रमांक आठमधील अनुराधा खेडकर, प्रभाग क्रमांक १८ मधील कौसर बागवान निवडून आले आहेत. शिवसेनेनेही महापौरपदावर दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ चार नगरसेवक आहेत. त्यांच्याकडे प्रभाग क्रमांक सहामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटात माधवी गवंडी या निवडून आल्या आहेत. दरम्यान महापालिकेतील महायुतीतील नगरसेवकांचे बलाबल पाहिले की भारतीय जनता पक्ष महापौरपदावर आपला नगरसेवक बसविणार हे निश्चित मानले जात आहे.