भाजपकडून जिपसाठी ४१, पंचायत समितीसाठी ७२ उमेदवार ! काही तालुक्यात स्वतंत्र, काही ठिकाणी युती! !
schedule21 Jan 26 person by visibility 128 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हा परिषदव पंचायत समित्यासाठी उमेदवारी निश्चित करण्यात आली. जिल्हा परिषदेसाठी भाजपने ४१ जणांना उमेदवारी दिली. तर ७२ ठिकाणी भाजपच्यावतीने पंचायत समितीची निवडणूक लढवली जाईल. नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकीतील विजयाची पुनरावृत्ती, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत होईल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांच्यासह भाजपच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
करवीर तालुक्यातील दक्षिण विभागात आणि राधानगरी तालुक्यात भाजप स्वतंत्र लढणार आहेत. याशिवाय गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यातही भाजप स्वतंत्रपणे जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जात आहे. गगनबावडा तालुक्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली. पन्हाळा तालुक्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात युती असून, जनसुराज्य शक्ती पक्षाशी मैत्रीपूर्ण लढत होईल.
शाहूवाडी तालुक्यात भाजप आणि जनसुराज्य शक्ती यांच्यात मैत्रीपूर्ण लढत असेल. हातकणंगले तालुक्यात भाजप-शिवसेना युती आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार मैत्रीपूर्ण लढत करतील. शिरोळमध्ये भाजप स्वतंत्रपणे लढणार असून, कागल आणि करवीर तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी यांची आघाडी एकत्र असेल. भुदरगडमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवतील. याशिवाय आजरा आणि चंदगड या दोन्ही तालुक्यात भाजप जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार आहे.मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवार निश्चित केले आहेत. खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, आमदार अमल महाडिक, शिवाजी पाटील, राहुल आवाडे, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी ही माहिती दिली आहे.