जिल्हा परिषदेची निवडणूक, कार्यकर्त्यांच्या सन्मानाची ! कार्यकर्त्यांना पद, राजकारणात मोठं करणं हा महाडिक पॅटर्न ! !
schedule21 Jan 26 person by visibility 15 categoryजिल्हा परिषद
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली, आणि त्या सोबतच संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू झाली ती गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक निवडणूक लढणार का ? कोणत्या मतदारसंघातून त्या उमेदवारी करणार ? त्याला कारणही तसेच होतं, शौमिका अमल महाडिक या २०१७ मध्ये ज्या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या, तो पुलाची शिरोली हा मतदारसंघ यंदा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाला. यामुळे समर्थक व कार्यकर्त्यांकडून शौमिका महाडिक यांनी आपल्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा आग्रह झाला. कधी कळंबा, कधी गोकुळ शिरगाव, कधी कुंभोज मतदारसंघांची नावं पुढे आली. त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी म्हणून समर्थकांनी थेट भारतीय जनता पक्षाचे कार्यालय गाठलं आणि कुंभोज मतदारसंघातून लढावे यासाठी कार्यालयात ठिय्या मारला. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्याकडे आग्रह धरला. काहींनी, माजी आमदार महादेवराव महाडिक यांची छत्रपती राजाराम कारखाना येथे भेट घेत शौमिका महाडिक यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी द्यावी यासाठी पाठपुरावा केला. अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्या उमेदवारीची आणि मतदारसंघाची चर्चा होत राहिली. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे साऱ्यांनी त्यांच्या नावाचा आग्रह धरला. मात्र जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषविलेल्या शौमिका महाडिक यांनी साऱ्यांनाच चकीत करणारा निर्णय घेतला.
‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी असतात. त्यांच्या सन्मानाच्या या निवडणुका आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत हे कार्यकर्ते नेतेमंडळीच्या विजयासाठी जीवाचे रान करतात. तेव्हा जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत त्यांनाच संधी मिळायला हवी. यासाठीच आपण जिल्हा परिषदेची निवडणूक कोणत्याही मतदारसंघातून लढविणार नाही.’असे शौमिका महाडिक यांनी जाहीर केले. राजकारणात कार्यकर्त्यांना पद देणं, राजकारणात कार्यकर्त्यांना मोठं करणं हा महाडिक पॅटर्न आहे. त्यानुसार जिल्हा परिषद निवडणुकीत उतरणार नाही.’अशा शब्दांत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. त्या महाडिक कुटुंबीयांच्या समाजकारण व राजकीय कार्याचा वारसा चालवित आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या त्या सूनबाई.
जिल्ह्यातील राजकारणात महाडिक कुटुंबीयांचे वेगळं स्थान. महादेवराव महाडिक यांनी राजकीय, सहकार, कारखानदारी आणि गोकुळचे राजकारण गाजविलं. महापालिकेत पंधरा वर्षे एकहाती सत्ता राबविली. सामान्य कार्यकर्त्यांना नगरसेवक केलं. अनेकांना महापौर बनविलं. मानाची पदं दिली. त्यांच्या पाठोपाठ पुतणे खासदार धनंजय महाडिक, मुलगा आमदार अमल महाडिक, स्नुषा व गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक या राजकारणात सक्रिय आहेत. सध्या महाडिक कुटुंबीय भाजपात आहे. शौमिका महाडिक या भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा आहेत २०१७ मध्ये त्या जिल्हा परिषदेत निवडून आल्या. जवळपास तीन वर्षे अध्यक्षपद भूषविलं. गोकुळच्या राजकारणातही त्या आघाडीवर आहेत. दूध उत्पादकासाठी काम करण्यात त्या पुढे आहेत. डिबेंचर कपातीच्या विरोधात त्यांनी आवाज उठविला. दूध उत्पादकांना सोबतीला घेऊन मोर्चा काढला. जिल्ह्यतील नेते मंडळींनाही दखल घ्यावी लागली. अभ्यासूपणाला आक्रमक नेतृत्वाची जोड. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी सभा गाजविल्या.
जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली आणि सर्वाधिक चर्चा रंगली ती, शौमिका महाडिक या निवडणूक लढविणार की नाही ? त्यांनी एकदा प्रतिनिधीत्व केलेल्या पुलाची शिरोली हा मतदारसंघ ओबीसीसाठी आरक्षित झाला. यामुळे त्यांच्या नावाभोवती वेगवेगळे मतदारसंघ जोडले. कुंभोज मतदारसंघात तर ११ इच्छुक उमेदवार एकत्र आले आणि त्यांनी शौमिका महाडिकांनी निवडणूक लढवावी असा आग्रह धरला. मात्र कोणताही आततायीपणा न करता महाडिक या शांत राहिल्या. अखेर त्यांनी, भूमिका स्पष्ट केली. ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी असतात. त्यांच्या सन्मानाच्या या निवडणुका आहेत. यामुळे आपण लढणार नाही’असे सांगितले. माजी आमदार महादेवराव महाडिक यांची शिकवण अंमलात आणली. शिरोलीच्या निवडणुकीत माजी आमदार महाडिक यांनी जाहीर केले होते की, ‘जिल्हा परिषदेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत. यामुळे त्या निवडणुकीत महाडिक कुटुंबांतील सदस्य उभा राहणार नाही. कार्यकर्त्यांना संधी देऊ, निवडून आणू.’
महाडिक यांनी आतापर्यंत अनेक कार्यकर्त्यांना कारखाना, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत मानाची पदं दिली. सभापती, अध्यक्ष, महापौर केले. तोच पॅटर्न महाडिक कुटुंब पुढे चालवित असल्याचे शौमिका महाडिक यांनी कृतीतून दाखवून दिले. राजकारणातील हे वेगळेपणे सध्यस्थितीत त्यांची ओळख आणखी ठसठशीत करणारे ठरत आहे. कारण जिल्ह्यातील अनेक नेतेमंडळी, आपल्या कुटुंबांतील सदस्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळवून देण्यासाठी ताकत पणाला लावत आहेत. दुसरीकडे महाडिक यांनी कार्यकर्त्यांना प्राधान्य हा नारा देत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून लांब राहणे पसंत केले. साहजिकच शौमिका महाडिक यांचा हा निर्णय राजकारणातील वेगळया पैलूवर प्रकाशझोत टाकणारा आहे.