कुंभार समाजाच्या बापट कॅम्प येथील जागेच्या मालमत्ता पत्रकांचा प्रश्न मार्गी लावा : राजेश क्षीरसागर
schedule20 Nov 23 person by visibility 366 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :कुंभार समाजाच्या बापट कॅम्प येथील जागेच्या मालमत्ता पत्रकांचा प्रश्न मार्गी लावा अशा सक्त सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
कुंभार समाजाच्या प्लॉट हस्तांतरण, कर्ज बोजा आदी विषयी क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली.
कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सहकारी सोसायटी लि. कोल्हापूर हि संस्था सन १९५७ साली स्थापन करण्यात आली आहे. सदर संस्थेअंतर्गत नोंदणीकृत सभासदांना व्यवसायासाठी बापट कॅम्प येथील सुमारे २९ एकर २५ गुंठे इतकी जागा सन १९६४ मध्ये कब्जापट्टीद्वारे देण्यात आली आहे. या जागेचे संस्थेने गरजू व पात्र सभासदांना वाटप केले होते. परंतु गेल्या दहा वर्षात कुंभार समाजातील पात्र सभासदास जागा हस्तांतरित करण्याचे काम थांबले असल्याने सभासदांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शासकीय नियमानुसार प्लॉट हस्तांतरित करण्यास, कर्ज बोजा नोंद होण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करून सदर जागेच्या मालमत्ता पत्रकांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशा सूचना क्षीरसागर यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या.
जिल्हाधिकारी रेखावार यांनी, मालकी हक्कासंदर्भातील प्रस्ताव संस्थेच्या सभासदांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन केले. यासह भोगवटादार वर्ग १ नोंद पूर्ववत करण्याबाबत नियमानुसार आवश्यक कारवाई करण्याचे आदेश संबधित तहसीलदार यांना दिले.
यावेळी जिल्हा भूमापन अधिकारी सुदाम जाधव, नगर भूपान अधिकारी शशिकांत पाटील, करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे, महसूल तहसीलदार सरस्वती पाटील, मंडल अधिकारी संतोष पाटील, मुख्य तलाठी विपिन उगलमुगले, कनिष्ठ लिपिक अस्मिता काकोडकर, शिवसेना उपशहरप्रमुख अभिजित कुंभार, माल उत्पादक सोसायटी चेअरमन महिंद्र नागांवकर, मूर्तिकार संघटना अध्यक्ष प्रमोद कुंभार, कोल्हापूर शहर कुंभार सोसायटी संचालक शांताराम माजगावकर, विजय पुरेकर, शिवाजी कुंभार, एकनाथ माजगावकर, चंद्रकांत कुंभार, कमलाकर आरेकर, राकेश वडणगेकर, आशिष पाडळकर आदी कुंभार समाजाचे सभासद उपस्थित होते.